मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील महाराष्ट्रातील घरा-घरांत पोहचले आहेत. मराठा जातीसाठी प्राणपणाने लढणारा सामान्य माणूस म्हणून जरांगे पाटील यांना जनता येत्या काही वर्षांत तरी नक्कीच लक्षात ठेवेल. प्रस्थापित मराठा नेतृत्वापेक्षा स्वतःच्या वेगळ्या गोष्टींनी आणि संघर्षमय लढ्याने जरांगे पाटलांनी राज्यातील मराठा बांधवांना भुरळ घातलीय. मराठा समाजाला त्यांचा नेता मिळालाय हे जरांगे यांच्याबाबतीत केलेलं विधान आता समर्पक वाटत चाललंय. आता जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला ४० दिवसाचा अल्टीमेटम संपून गेलेला आहे. आजपासून त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यारं उपसलं आहे. पण सोशल मीडियावर अनेकांनी आता वेगळ्याच लेव्हलवर रान तापवायला सुरूवात केली आहे. ती म्हणजे जरांगे पाटील यांनी आता एक नवीन राजकीय पक्ष काढावा आणि लोकसभेला ४८ जागा लढवून या प्रस्थापित मराठा नेतृत्वाला धडा शिकवावा. पण लोकांची ही मागणी असली तरी रिअल स्तरावर हे शक्य आहे का? जर मनोज जरांगे यांनी राजकीय पक्ष काढला तर ते किती जागा जिंकू शकतील ? त्यांचा पक्ष कुणाचं नुकसान करू शकेल ? कोणाच्या आणि कुठल्या पक्षाच्या जागा ते पाडू शकतील? त्यांचा पक्ष फडणवीस की शरद पवार, कोणाचं नुकसान करेल? सगळंच इन डिटेलमध्ये जाणून घेऊयात.

(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
खरंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे नेते सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसाठी फायद्याचे आणि तोट्याचेही असतात. त्याची केवळ कुठलीतरी एकच बाजू विचारात घेता येत नाही. या फायद्या-तोट्याची कारणं म्हणूनच आपण समजून घेऊ.सगळ्यात पहिल्यांदा विरोधकांना होणारा फायदा समजावून घेऊ. तर बघा सध्या महाराष्ट्रात ठाकरे गट , शरद पवार गट आणि काँग्रेस हे विरोधी पक्षात आहेत. मनोज जरांगे यांना अपेक्षित असलेली आरक्षणाची मागणी सत्ताधारी पूर्ण करू शकले नाहीत तर त्याचा फायदा विरोधकांना नक्कीच होऊ शकतो. कारण सरकारने आरक्षण देऊ देऊ म्हणत मराठा आंदोलकांची बोळवण केली, त्यांना झुलवत ठेवलं आणि शेवटी विश्वासघात केला या मुद्द्यांचा आधार घेऊन जरांगे यांना मिळणारा पाठिंबा स्वतःकडे घेण्यासाठी विरोधी पक्ष जोरदार प्रयत्न करू शकतो. कुठल्याही पक्षात थेट सहभागी न होता सत्ताधारी पक्षाला टार्गेट करून जरांगे पाटील हे त्यांच्या सभांद्वारे सत्ताधार्यांना त्यावेळी damage करू शकतात. याचा अल्टीमेट फायदा अशावेळी महाविकास आघाडीला होऊ शकतो.
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
विरोधकांना होणारा दुसरा फायदा म्हणजे मराठा मतांचं ध्रुवीकरण. म्हणजे बघा एकनाथ शिंदे, अजित पवार गट किंवा भाजपमधील उमेदवारांना मिळणाऱ्या मराठा मतांमध्ये जरांगे पाटलांच्या उमेदवारामुळे घट होऊ शकते.आता राज्यात जवळपास १७५ मराठा आमदार आहेत. ही संख्या मोठीच आहे. याव्यतिरिक्तही इतर उमेदवार निवडून येतात, त्याठिकाणी मराठा मतांची टक्केवारीही दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही. ही पवार शिंदे फडणवीस यांची पारंपरिक मराठा व्होट bank त्यावेळी जरांगेच्या पाठीमागे जाऊन महायुतीचं नुकसान करू शकते. तितकी न्यूसेंस value नक्कीच जरांगे पाटलांमध्ये आहे.

(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
तिसरा घटक आहे तो एकत्रित नाराजीचा. तर बघा भाजप पक्षाचं फोडाफोडीचं राजकारण, त्यांच्याच पक्षात ज्येष्ठ नेत्यांना देण्यात येणारी दुय्यम वागणूक आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर करण्यात आलेली फसवणूक या गोष्टी सत्ताधारी पक्षांवर बुमरँग होऊन उलटू शकतात. शिवाय सत्ताधारी पक्षातील छगन भुजबळ, रामदास कदम, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी जरांगे आणि त्यांच्या एकूण मागणीला चुकीचं ठरवणारी काही विधानं केली आहेत. हे करत असताना त्यांनी मराठा-ओबीसी वाद वाढेल असा प्रयत्नही जाणते-अजाणतेपणी केला असल्याच्या चर्चा आहेत. या सगळ्याचा मोठा तोटा ही त्यांना सहन करावा लागू शकतो
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
पण यातील दुसरा भाग आहे तो सत्ताधारी पक्षाने मराठा आंदोलकांची मागणी पूर्ण केली तर काय होईल ?
म्हणजे बघा, आमदार अपात्रता प्रकरण, पक्ष फोडाफोडी करून मिळवलेली सत्ता यांमुळे विद्यमान सरकार आणि त्यातील काही मंत्र्यांविरोधात जनतेच्या मनात रोष आहे. वाढती बेरोजगारी आणि महागाई यामुळं जनता त्रस्त आहे. निसर्गचक्र बिघडल्याने आणि शेतमालाला योग्य तो हमीभाव मिळत नसल्याने गरीब शेतकरीसुद्धा हवालदिल आहे. अशा परिस्थितीत आरक्षण देण्याच्या मागणीची पूर्तता येत्या निवडणुकीपर्यंत झाली तरी जनतेसाठी तो दिलासा असेल. अशावेळी एकनाथ शिंदे म्हणतात त्याप्रमाणे ‘सर्व सामान्यांचं सरकार’ ही त्यांची उक्ती खरी ठरेल आणि राज्यातील जनतेचा पाठिंबा त्यांना मिळूही शकेल. कालच्या दसरा मेळाव्यात तर त्यांनी आरक्षण देण्याबद्दल सरकार कसं वचन बद्ध आहे, यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथही घेतलीय. असो , पण दुसरीकडे या आरक्षणाच्या निमित्ताने राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेसच्या ताब्यात असलेली मराठा व्होटबँक स्वतःकडे वळवण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना त्यामुळं यश येऊ शकतं. याचा फायदा त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो.

(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
आता तिसरी शक्यता आहे मनोज जरांगे यांनी स्वतःचा पक्ष काढला तर? मागील आठ-दहा दिवसांत याबद्दल गावच्या पारांवर आणि सोशल मीडियावर व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये बरीच चर्चा झाली. विधानसभेत एक उमेदवार निवडून यायला लाखभर मतं बास होतात. जरांगे यांच्या सगळ्या सभांना मिळुन दीड कोटी मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. या हिशोबाने जरांगे पाटलांनी पक्ष काढला तर त्यांचे ८० ते १०० आमदार सहज निवडून येतील. आणि कदाचित जरांगे मुख्यमंत्रीही बनतील अशा लेव्हलच्या चर्चा लोकांनी केल्या आहेत. तसेच जरांगे मराठा-बहुल भागातून किमान ८-१० खासदार निवडून आणू शकतील ही शक्यताही लोक वर्तवताना दिसतायत पण सोशल मीडियावर मांडणी होतेय तेवढी ही गोष्ट सरळसोट आहे का ?
महत्वाचं म्हणजे जरांगे पाटील हे त्यांचा हा मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भातील सामाजिक न्यायाचा लढा राजकारणाच्या दिशेने वळवतील का? हा प्रश्न आहे.
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
तसंही महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट हा बऱ्याच खेळयांनी , गेमांनी भरलेला आहे. अनेक दशकांचा राजकीय वारसा असलेल्या पक्षाचे मतदार असे एका निवडणुकीत इकडून तिकडे फिरणं एवढं सहज शक्य नाही. ते सभा ऐकायला जातात पण निवडणुकीत मतदान स्वतःला वाटेल त्यालाच करतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर राजकारणात वेगळा प्रयोग करण्याची इच्छा बाळगणारे राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी हे नेते. राज ठाकरेंनी मराठी विरुद्ध अमराठी असं narrative तयार केलं किंवा विकासाच्या ब्लूप्रिंट दाखवल्या तरी त्यांच्या पक्षाला मतदानावेळी फटका बसला. ठाकरेंच्या सभेला हजारो-लाखो लोकं येतात, टीव्हीवर सभा पाहणारेही तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लोक असतील मात्र म्हणून राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष कधीही १५ पेक्षा जास्त आमदार निवडून आणू शकले नाहीत. स्वतः राज ठाकरेंनी ही खंत सर्वांसमोर बोलून दाखवली होती. तीच गोष्ट प्रकाश आंबेडकर यांची. आधी भारिप बहुजन पक्ष आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित घटकांना एकत्र करुन निवडणूक लढण्याचं काम आंबेडकर ३० वर्षांपासून करतायत. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या कधीही दोन आकडी नव्हती. स्वतः त्यांनी १० वेळा निवडणूक लढवली मात्र त्यात ते ८ वेळा पराभूत झाले. तिसरं उदाहरण राजू शेट्टी यांचं. सरंजामी कारखानदार आणि जुलमी व्यवस्था यांना टक्कर देत राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बांधणी केली. मात्र मोजके ४-५ अपवाद वगळता त्यांचे आमदार निवडून आले नाहीत. ज्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढतात तेच शेतकरी सर्वस्वी त्यांना मतदान करत नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
एकूण काय या तिघांचं उदाहरण पाहता ठाकरेंचा मराठी-अमराठी, आंबेडकर यांचा वंचित किंवा शेट्टी यांचा शेतकरी फॅक्टर निवडणुकीत काही अपवाद वगळता यशस्वी होत नाहीत. मात्र तरीही त्यांचा दबावगट राज्यात आहे आणि सत्ताधारी किंवा विरोधक तो विचारात घेतात हेही वास्तव आहे. तीच गत राजकारणात मनोज जरांगे पाटील यांची होऊ शकते.असं काही तज्ञांना वाटतंय. कदाचित त्यांच्या पक्षाचा एकही आमदार किंवा खासदार निवडून यायचा नाही. पण तरीही जरांगे यांनी पक्ष काढलाच तर प्रस्थापित पक्षाच्या अनेक उमेदवारांना ते जेरीस आणू शकतात किंवा पाडूही शकतात. म्हणजे जो निवडून येण्यासारखा आहे त्याला मराठा कार्ड वापरून पाडायचं ही खेळी जरांगे पाटील करू शकतात.
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
महाराष्ट्रातील मराठवाडा भागात सध्याच्या मराठा आंदोलनाचं लोण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं जरांगे यांनी पक्ष काढला तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना आणि हिंगोली जिल्ह्यांतून लोकसभेच्या ८ ते १० जागा तर विधानसभेच्या ३५ ते ४० जागांवर त्यांचा पक्ष उलथापालथ करू शकतो. मराठवाड्याशिवाय उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे या जिल्ह्यांत तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर या जिल्ह्यांतही जरांगेंची जादू काही प्रमाणात चालू शकते. मागील लोकसभा निवडणूकीत भाजप आणि शिवसेनेला मिळून मराठवाड्यातील खासदारकीच्या जवळपास सर्व जागा मिळाल्या होत्या. त्या जागांवर जरांगे प्रभाव टाकू शकतात. विधानसभेच्या ज्या ३५ ते ४० जागांचा उल्लेख केला आहे, त्यात सर्व प्रस्थापित पक्षांचे उमेदवार आहेत. जे उमेदवार मराठा आणि ओबीसी यांची मोट बांधू शकतील त्यांच्यासाठी निवडणूक तुलनेने सोपी राहील. मराठवाड्यात आम मराठा आणि खास मराठा असे मराठ्यांमधलेच दोन प्रकार अस्तित्वात आहेत. तेही एकमेकांशी चांगल्या पद्धतीने जोडले गेलेले आहेत असं बिल्कुल नाही. त्यांच्यात रोटी-बेटी व्यवहार चालत नाही. आणि जो खालचा-वरचा असा भेद आहे तो ते पाळताना दिसतातच.

(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
यामुळे त्याठिकाणी जरांगे इफेक्ट मोठ्या प्रमाणावर active होऊ शकतो. आता मनोज जरांगे यांचा राजकीय पक्ष कुठल्या विद्यमान खासदारांना अडचणीत आणू शकतो, ते थोडक्यात पाहूयात ..
नंबर एक , प्रीतम मुंडे – गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीच्या लाटेवर प्रीतम मुंडे दोनदा निवडून आल्या खऱ्या, पण २०२४ च्या निवडणुकीत त्यांच्या विजयाची शक्यता धूसर आहे. भाजपची मुंडे परिवारासोबत असलेली सध्याची वागणूक पाहता त्यांना तिकीट मिळण्याची शक्यताही कमी आहे. अशात त्यांना तिकीट मिळालंच तर वंजारी विरुद्ध मराठा हा घटक मतदारसंघात काम करेल. महाविकास आघाडीतर्फे तगडा उमेदवार देऊन प्रीतम मुंडेंना पराभूत करण्याची खेळी याठिकाणी खेळली जाऊ शकते. त्यात धनंजय मुंडे हे जर बीड लोकसभेला महायुतीचा चेहरा झाले तर मग प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे काय भूमिका घेतील हे पहावं लागेल. जरांगे यांनी बीडमध्ये दोनदा सभा घेऊन मराठा आंदोलकांना एक होण्याचं आवाहन केल्याने इथे पुढील निवडणुकीत धक्कादायक निकाल पहायला मिळू शकतो.
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
नंबर दोन, रावसाहेब दानवे – ५ वेळा भाजपचे खासदार राहिलेले रावसाहेब दानवे मराठवाड्यातील महत्वाचे नेते. केंद्रात मंत्रिपद, महाराष्ट्र भाजपचं प्रदेशाध्यक्षपद ही महत्त्वाची पदं त्यांना मिळाली आहेत. जरांगे यांच्या आंदोलनस्थळीदेखील त्यांनी जातीने हजेरी लावली. मात्र मराठयांना आरक्षण न मिळाल्यास मतदारसंघातील मराठा बांधवांचा रोष त्यांच्यावर निघू शकतो. २५ वर्षं खासदारकी मिळूनसुद्धा भागाचा विकास न केल्याची खंत जालन्यातील लोक बोलून दाखवतात. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या कल्याण काळे यांना उमेदवारी मिळू शकते. आता जरांगे पाटील यांची भव्यदिव्य सभा जालन्यातच पार पडली होती. अशातच जरांगेंनी राजकीय पक्षात उडी घेतली तर त्यामुळे दानवेंची सीट धौक्यात येऊ शकते.

(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
नंबर ३ प्रतापराव जाधव – बुलढाण्यातून खासदारकीची दुसरी टर्म सांभाळणाऱ्या प्रतापराव जाधव यांना मतदारसंघातील निष्क्रियता आणि अँटीइंकंबन्सीचा तोटा होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे मूळ शिवसैनिक मतदारांची नाराजीही याठिकाणी विचारात घ्यावीच लागते. शिवाय मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकार व्यवस्थित हाताळू न शकल्यास त्यांना मतदारसंघातील मराठा बांधवांकडून फटका बसू शकतो. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळू शकते.
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
नंबर ४ प्रताप पाटील चिखलीकर – अशोक चव्हाण यांचा पराभव करून खासदार झालेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा मतदार नाकारू शकतात. सर्वपक्षीय हितसंबंध असलेले चिखलीकर पैशा-पाण्यानेही समृद्ध आहेत. मात्र मतदारसंघातील विकासकामांबाबत ठणठणाट दिसून येतो . अशोक चव्हाण यांना भारत जोडो यात्रा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा पुढील निवडणुकीत होऊ शकतो. मागच्या वेळी वंचितमुळे इथून अशोक चव्हाण पडले. त्यामुळेच मध्यंतरी प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या भेटीचं अशोक चव्हाणांनी कौतुक केलं. अर्थात अशोक चव्हाण यांच्याविरोधातील मराठा आंदोलकांची लाट यामुळे इथं तिसर्या पर्यायाचीही चाचपणी होऊ शकते. इथं वंचितनं वेगळी वाट धरली तर अजून व्होट डिव्हीजन होऊन मराठा मतं फोकसला येतील. अर्थात जरांगे पाटील यांनी इथून उमेदवार उभा केला तर त्याचे जिंकण्याचे चान्सेसही नाकारता येत नाहीत.

(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
नंबर पाच धैर्यशील माने – जरांगे यांच्या आंदोलनाची धग पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने कमी असली तरी काहीच भूमिका न घेणाऱ्या खासदारांना याचा फटका बसू शकतो. जसं की धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचा हात पकडला. त्यामुळं मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी आहे. गत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे त्यांना राजू शेट्टी यांच्याविरोधात विजय मिळवणं सोपं गेलं. हातकनंगले मतदारसंघात मराठा, जैन आणि लिंगायत धर्मीय लोकांची संख्या समसमान आहे. अशात इथला मराठा मतदार विभागला गेला तर त्याचा तोटा मानेंना बसू शकतो. माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील ४ वर्षांत इथला जनसंपर्क वाढवला असून जरांगे यांच्याविषयी त्यांचं मत सकारात्मक आहे.
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
नंबर सहा संजय पाटील – मोदीलाटेत दोनदा निवडून आलेल्या संजय पाटलांना गेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची मदत झाली होती. इथले दोन्ही प्रबळ उमेदवार मराठा असले तरी विद्यमान खासदारांना अँटीइंकंबन्सीचा फटका बसू शकतो. शिवाय पक्षांतर्गत गटबाजीचा फटका आणि मराठा मतदारांची विभागणी हे घटक संजयकाका पाटलांसाठी अडचणीचे ठरू शकतात. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे विशाल पाटील निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे.

(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
नंबर सातवर या यादीतील अजून एक नाव आहे ते अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचं. शरद पवार यांना दिलेला धोका, रायगड भागातील शेतकरी कामगार पक्षाची स्पेस व्यापण्याचा प्रयत्न, कुणबी विरुद्ध आग्री असं मतांचं राजकीय गणित आणि छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरोधात केलेली टिप्पणी हे घटक सुनील तटकरे यांच्या विरोधात आहेत. त्यांचे मोठे बंधू अनिल तटकरे यांनी नुकतीच सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यामुळं शरद पवार गटातर्फे वेगळी खेळी खेळली जाणार का याची चर्चा आहे. तटकरे यांना आणि त्यांच्या कन्येला पक्षात वेळोवेळी लाभाची पदं मिळत गेली, शिवाय शिवसेनेच्या जिल्ह्यातील आमदारांना त्यांनी कायम दुय्यम समजलं. या सगळ्या घटकांचा विचार करता पुढील निवडणूक त्यांच्यासाठी अडचणीची ठरू शकते. इथली मराठा मतविभागणी तसेच भरत गोगावलेंसारख्या तटकरेविरोधाची किनार महायुतीला आतून damage करु शकते .
(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
खरंतर सध्या कुठलाही आमदार, खासदार कुठल्याही वेळी पक्ष बदलून दुसरीकडे जात आहे. अशा परिस्थितीत त्यांना निवडणुकीत उमेदवारी मिळणार का? पक्ष बदलल्याचा फटका त्यांना बसणार का? असे सगळेच प्रश्न उपस्थित होताना दिसतात. शरद पवार हे मराठा राजकारणातील महत्वाचे नेते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचं बोललं गेलं . मात्र सध्या तरी तशी स्थिती दिसून येत नाही. कारण राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटाचे सध्या ३ खासदार असून ते पुणे आणि सातारा भागात आहेत. इथला मतदार देशात काहीही चित्र असलं तरी खासदारकीच्या निवडणुकीत शरद पवारांसोबत राहतो हा इतिहास आहे. शिरूर मध्ये आढळराव आणि कोल्हे हा वाद असला तरी तिथे महाविकास आघाडीची सीट पडण्याचा धोका कमी आहे. सातारा लोकसभेची लढत ही गतनिवडणुकीप्रमाणेच प्रतिष्ठेची होईल. मात्र या सर्वात मनोज जरांगे पाटील फॅक्टर कुठे काम करेल असं चित्र सध्या तरी नाही. पण एकूणच काय तर शरद पवारांना जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा फायदा होईल, हे यामुळे म्हणणंही भाबडेपणाचं ठरेल. कारण अभ्यासाअंती असं दिसतंय की शरद पवार गटाच्या सध्याच्या खासदारकीच्या सीटा बघता तसेच मराठाबहुल भागातील आमदारांची संख्या बघता तिथून संभावित खासदारकीच्या उमेदवारांना जरांगे इफेक्टचा तोटाही सहन करावा लागू शकेल . कारण जसं वंचितमुळं गेल्या निवडणुकीत कांग्रेस राष्ट्रवादीचे ८ खासदार पडले तसंच मराठा व्होट डिव्हीजनमुळे फडणवीस शिंदे सोबत शरद पवारांचे हे उमेदवारही gas वर नक्कीच बसू शकतील.

(Manoj Jarange Patil | Vishaych Bhari)
हे विषयच भारी वाचलेस का भावा !
- जरांगे पाटलांच्या सभांमुळे मराठा समाजाचे हे ५ नेते पडतील | Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari
- जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी सरकारचा प्लॅन ऍक्टिव्ह झालाय | Manoj Jarange Patil Live Sabha
- मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याचे दुसरे विनायक मेटे ठरतायत का l Manoj Jarange Patil | Vinayak Mete
- मराठा समाजाच्या या माणसानं सरकारला गुडघ्यावर कसं आणलं | Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari
- जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 13 वा दिवस, बिना अन्नपाण्याचा माणूस किती दिवस जगू शकतो | Manoj Jarange Patil Latest News | Maratha Arakshan Andolan News Today
आता कुठलाही नेता एखाद्या विशिष्ट समाजाचा आहे म्हणून त्याला त्या समाजाची सगळी मते मिळतील या भाबड्या आशेतूनही बाहेर येणं गरजेचं आहे. दुबळ्या, पिचलेल्या, गरीब कष्टकरी मराठ्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला तर त्यांच्यात सुधारणा होईल हा आशावाद बाळगून मराठा आंदोलन सुरू झालंय. या आंदोलनाने महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालय. त्याचं रूपांतर राजकीय लढ्यात होऊन यश मिळण्याची शक्यता किती ते आता सांगणं मात्र जरा घाईचंच होईल. थांबा आणि पहा हेच धोरण त्यावरचा उपाय म्हणायचा. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? जरांगे पाटलांनी पक्ष काढणं त्यांना फायद्याचं आहे का? त्यामुळे काही दबावगट तयार होईल का? जरांगे पाटील नवीन राजकीय पक्ष काढून सर्वपक्षीय नेत्यांना हिसका दाखवू शकतात का ? त्यांनी तसं पाऊल उचललं पाहिजे का? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
Leave a Reply