मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आंदोलनाची दिशा २२ “ऑक्टोबरला स्पष्ट केली. आरक्षण देणं जमत नसेल तर पुढाऱ्यांना गावबंदी करा, त्यांना गावात फिरकू देऊ नका. ते आले तरी त्यांच्याशी वाद घालत बसू नका, शांततापूर्ण मार्गाने त्यांना परत लावा. २५ ऑक्टोबर पासून मी काही न खाता, पिता, कुठलेही वैद्यकीय उपचार न घेता आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहे. इतर मराठा बांधवसुद्धा २५ ऑक्टोबरपासून साखळी उपोषणाला सुरुवात करतील आणि २८ तारखेपासून तेही आमरण उपोषणाला बसतील. सरकारला मराठ्यांचं हे पाऊल पेलणार नाही आणि झेपणारही नाही” अशा शब्दांत जरांगे यांनी आपलं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. या परिस्थितीत सरकारचा कुठलाच प्रतिनिधी जरांगे यांच्याशी संपर्क साधताना दिसत नाही. याउलट सरकारमधील मंत्री आणि इतर नेते जरांगे यांच्या आंदोलनाला दुय्यम ठरवण्याच्या प्रयत्नात लागले आहेत. जरांगेंची मागणी रास्त नाही, त्यांचा अभ्यास कमी आहे असं म्हणत त्यांना उकसवण्याचा प्रयत्नही काही नेत्यांनी करून पाहिला. सरकार जरांगेंना हलक्यात घेतंय का किंवा जरांगेंना डॅमेज करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे का अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होते. याच काही शक्यतांचा आढावा

(Manoj Jarange Patil Live Sabha)
मागील दीड महिन्यांत घडलेल्या ६ घटनांवरून सरकार जरांगेंची फसवणूक करतय किंवा त्यांना हलक्यात घेतंय हे लक्षात येऊ शकतं यातलं पहिलं कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं एक वाक्य..मराठा आरक्षणासंदर्भात नेमका काय निर्णय घ्यायचा याविषयी सर्वपक्षीय बैठक झाली. ती झाल्यानंतर पत्रकार परिषदेला सामोरं जाण्यापूर्वी सत्ताधारी पक्षातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील एक संभाषण व्हायरल झालं. माईक चालू असल्याने आपसांत बोललं गेलेलं हे संभाषण इतरांपर्यंत पोहोचलं. त्यामध्ये आपण “बोलून मोकळं व्हायचं आणि निघायचं” असं शिंदे म्हणाल्याचं स्पष्ट झालं. आश्वासन द्यायला काय जातंय, तेवढ्यापुरती वेळ मारुन नेली जाते असा त्या विधानाचा अर्थ अनेकांनी काढला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सारवासारव केली असली तरी शिंदे या आंदोलनाबाबत सिरीयस नाहीत असा एक मेसेज लोकांमध्ये गेला.दुसरं कारण म्हणजे फडणवीस यांच्या ओबीसी पूरक भूमिका आणि मराठा आंदोलकांबाबत त्यांनी केलेलं वादग्रस्त वक्तव्य. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या ही मागणी जरांगे पाटील करत असताना फडणवीस मात्र ओबीसी आंदोलकांच्या व्यासपीठावर जाऊन त्यांना पाठिंबा देत होते. तुमच्या आरक्षणाला धोका पोहोचणार नाही असा दिलासा ओबीसी आंदोलकांना देत असताना फडणवीस भाजपची व्होट बँक नाराज होणार नाही याची पुरेपूर काळजी घेताना दिसले. अर्थात मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली या बेजबाबदार विधानानंतर फडणवीस यांनी आंतरवली सराटी येथे घडलेल्या प्रकाराबद्दल सरकारतर्फे जनतेची माफीही मागितली.
(Manoj Jarange Patil Live Sabha)
तिसरं कारण छगन भुजबळ यांची ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध असल्याची भूमिका. मराठ्यांना आरक्षण जरूर मिळावं पण ते ओबीसी कोट्यातून नाही ही मागणी छगन भुजबळ यांनी तीव्रपणे मांडली. जरांगे यांच्या आंदोलनाला पैसे कुठून येतात असा सवालही त्यांनी विचारला. एका मर्यादेनंतर आपली विधानं आपल्याच अंगलट येतील असं जाणवल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर पुढं बोलणंही टाळलं. चौथं कारण नारायण राणे आणि रामदास कदम यांनी कोकणातील मराठी बांधवांना कुणबी आरक्षण नको अशी केलेली मागणी. नारायण राणे म्हणाले, “९६ कुळी मराठे हे कुणब्यांहून वेगळे आहेत आणि त्यांना सरसकट आरक्षण नको आहे.” तर रामदास कदम म्हणाले, “कोकणात मराठा आणि कुणबी हे पूर्णतः वेगवेगळे आहेत. त्यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत नाहीत. विदर्भातील मराठा-कुणबी एक असतील पण कोकणात तसं नाही. जरांगे यांनी कदाचित फक्त मराठवाड्याचा अभ्यास केला असेल. त्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांनी सरसकट आरक्षणाची मागणी करू नये. मी तुम्हाला दाव्याने सांगू शकतो की कोकणातील मराठ्यांची आरक्षणाची मागणी नाही”

(Manoj Jarange Patil Live Sabha)
या दोन नेत्यांनी जरांगे यांच्या सरसकट कुणबी आरक्षणाच्या मागणीला खो घालणारी विधानं केली आहेत. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समिती आपल्या अहवालाची मांडणी करताना या गोष्टी विचारात घेणार का हा कळीचा मुद्दा आहे. कोकणातील सामान्य मराठा लोकांनी मात्र आम्ही राणे आणि कदम यांच्या बोलण्याशी सहमत नसल्याचं सांगितलं आहे. पाचवं कारण आहे गुणरत्न सदावर्ते. मराठा आरक्षणाला कायदेशीर खो घालण्यात गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा मोलाचा वाटा होता. याच सदावर्ते यांनी एसटी आंदोलनात मात्र एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिली होती. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला डीवचताना जरांगे पाटील यांच्या सभा जत्रेप्रमाणे आहेत. लोक येतात, फिरतात आणि निघून जातात अशा आशयाचं विधान सदावर्ते यांनी केलं. शिवाय जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा काय हात आहे? ठाकरे आणि पवार त्यांना पाठिंबा देतायत का, याची चौकशी करा असंही सदावर्ते म्हणाले होते. एकूणच मराठा आंदोलकांना डीवचण्याचा हा प्रयत्न सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळींनी केल्याचं दिसून येतं. याशिवाय सहावं महत्त्वाचं कारण म्हणजे २२ ऑक्टोबर २०२३ रोजी महाराष्ट्र सरकारने केलेली ews आरक्षणाची आणि मराठा बांधवांसाठी केलेल्या विविध योजनांची जाहिरातबाजी. राज्यातील मराठ्यांसाठी आम्ही वेगवेगळ्या मार्गांनी काय करत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सरकारने केला. मात्र त्यामध्ये जरांगे यांच्या मागणीला अनुसरून कोणत्याही गोष्टींचा उल्लेख नव्हता. शुद्ध मनाने दिलेल्या संधीचं सोनं करा, आम्ही पाया मजबूत केला आहे, सकारात्मक संधीकडे वाटचाल करा असा सल्ला या जाहिरातीतून देताना मराठा बांधवांना आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न सरकारने केलाय.
(Manoj Jarange Patil Live Sabha)
हे विषयच भारी वाचलेस का भावा !
- जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्र दौर्यामुळे हे ३ नेते डॅमेज झालेत | Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari
- मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याचे दुसरे विनायक मेटे ठरतायत का l Manoj Jarange Patil | Vinayak Mete
- मराठा समाजाच्या या माणसानं सरकारला गुडघ्यावर कसं आणलं | Manoj Jarange Sabha Live | Vishaych Bhari
- जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 13 वा दिवस, बिना अन्नपाण्याचा माणूस किती दिवस जगू शकतो | Manoj Jarange Patil Latest News | Maratha Arakshan Andolan News Today

पण एवढं सगळं करूनही मनोज जरांगे यांच्या सभांना होणारी गर्दी कमी झाली नाही किंवा त्यांच्या आंदोलनाविषयीचं लोकांमधलं आरक्षण कमी झालं नाही. अनुल्लेखाने मारणे हा प्रयोग सरकार मनोज जरांगे यांच्या बाबतीत करत नाही ना? लोक ओरडतील आणि गप्प बसतील कारण मागे आरक्षणाची मागणी केलेल्या अण्णासाहेब पाटील, शालिनीताई पाटील, विनोद पाटील यांची आठवण आता किती मराठे काढतात? असा विचार करून जरांगेंना करायची तेवढी हवा करू द्या..आमची वेळ आल्यावर आम्ही बरोबर गोष्टी मॅनेज करू असा सरकारचा एटीट्यूड तर नाही ना? ही शंकाही या निमित्ताने उपस्थित होतेय.पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? सरकार मनोज जरांगे यांची फसवणूक करतय का? किंवा सरकारच्या गोटातून त्यांना डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत का?जरांगे पाटील सरकारच्या या खेळीत दबतील, की पुन्हा पेटून उठतील?
तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
Leave a Reply