सलमान खानचं हिट and run प्रकरण असेल की मग काळवीट हत्या प्रकरण, त्याच्यासाठी जलद न्यायाची प्रोसेस होते. पण सर्वसामान्य गरीब कुटुंबातील विष्णू तिवारी निर्दोष असताना सुद्धा जेलमध्येच न्यायाच्या प्रतीक्षेत तब्बल वीस वर्षे काढतो.हातात पैसा आणि ओळख नसेल तर भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये तुमचा टिकाव लागू शकत नाही याचंच एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विष्णू तिवारी या माणसाची केस. 23 वर्षाच्या या विष्णूला खोट्या बलात्काराच्या केसमुळे तब्बल वीस वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. तो वीस वर्षानंतर जेलमधून बाहेर आला खरा पण बाहेर आल्यानंतर सगळ्या गोष्टी बदलल्या होत्या. त्याच्या कुटुंबात त्याचा एक भाऊ सोडून बाकी कोणीचं जिवंत नव्हत. जेलच्या बाहेर आल्यावर ज्या मुलीशी त्यानं लग्नं केलं ती त्याची बायको सुद्धा दागिने आणि पैसे घेऊन पळून गेली होती. बाहेर आल्यानंतर तो एकटा होता. त्याची स्वतःची अशी काहीचं ओळख नव्हती. 20 वर्षानंतरच्या या मोठ्या काळानंतर त्याला स्वतःच अस्तित्व निर्माण करणं खूपच अवघड झालं होतं. विष्णू 43 वर्षाचा झाला होता. निर्दोष सिद्ध होता होता त्याला त्याचं अर्ध आयुष्य जेलमध्येचं काढावं लागलं होतं. निकाल देण्यात झालेल्या दिरंगाईमुळ बिचाऱ्या विष्णुला निर्दोष असून सुद्धा 20 वर्ष जेलमध्ये काढावी लागली होती. नेमकी काय केस होती विष्णू तिवारीची ? कोण आहे हा विष्णू तिवारी आणि इतक्या दिवस त्याला जेलमध्ये का रहावं लागलं ? सगळ्याच प्रश्नांची इन डिटेल मध्ये उत्तर जाणून घेऊयात आणि एकूणच विष्णू तिवारीची ही दर्दनाक कहाणीही समजून घेऊयात.

(Vishnu Tiwari Case Study)
मंडळी विष्णुची केस समजून घेण्याआधी आपल्याला विष्णू तिवारी कोण होता हे समजून घेणं खूप महत्वाचंयं. तर बघा विष्णू हा उत्तरप्रदेशातल्या सिलावनं गावचा 23 वर्षीय तरुण. विष्णूचा जन्म साधारण 1977 चा. त्याचे वडील रामप्रसाद तिवारी हे एक गरीब शेतकरी. विष्णुला एकूण तीन भाऊ आणि आई. शिक्षणात तितकासा रस नसल्यामुळ विष्णुनं सातवी आठवीतच त्याच्या शिक्षणाला राम राम ठोकला. कमी शिक्षणामुळ त्यानं आपल्या घरच्याचं शेतात काम करायचं ठरवलं. सोबतीला बनारसी साडी बनवण्याचं कौशल्यही त्यानं शिकून घ्येतलं. तर बघा असं होतं विष्णू आणि विष्णुचं साधं, हसत खेळत, कुटुंब. फार श्रीमंत नसलं तरीही खूप मेहनती असं कुटुंब. पण या हसत्या खेळत्या कुटुंबात एक अशी घटना घडते ज्यामुळ ते कुटुंब एका झटक्यात उध्वस्त होतं. त्या कुटुंबातल्या 23 वर्षीय विष्णुवर बलात्कार केल्याचा आरोप होतो. त्यामुळ या कुटुंबाची समाजात फार मोठी नाचक्की होते. सगळा समाज त्यांना वाळीत टाकतो आणि मग सुरु होतो त्या सामान्य विष्णुचा स्वतःला निरपराध ठरवण्याचा संघर्ष. 2003 साली विष्णुवर बलात्कार केल्याप्रकरणी ललितपूरच्या आनंदफावन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंद होते. त्याच्याच गावातली एक दलित समाजातली महिला बलात्कार आणि जातीयवाचक शिव्या दिल्या प्रकरणी विष्णुविरोधात तक्रार नोंदवते. आरोप गंभीर असल्यामुळे पोलीस सुद्धा तातडीनं त्याच्यावर गुन्हा नोंदवतात आणि राहत्या घरातून विष्णुला अटक केली जाते. मंडळी विष्णुला जेंव्हा पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं तेंव्हा विष्णू इतर आरोपीसारखाचं आपण निर्दोष असल्याबद्दल पोलिसांना खूप सांगण्याचा प्रयत्न करतो. पण पोलीस मात्र त्याचं काहींचं ऐकून घेत नाहीत. त्यांनतर त्याची ललितपूर जिल्हा कारागृहात रवानगी होते आणि काही दिवसांनी स्थानिक ट्रायल कोर्टात त्याच्या केसची सुनावणी सुरु होते.
(Vishnu Tiwari Case Study)
पोलीस त्या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करून विष्णुच्या विरोधात फायनल चार्जशीट दाखल करतात. गुन्ह्यांचं गांभीर्य समजावून घेऊन ट्रायल कोर्ट विष्णुला दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावतं. त्यानंतर त्याला आग्ऱ्याच्या सेंट्रल जेलमध्ये नेलं जातं. जेलमध्ये गेल्यावर त्याला आपण नक्की काय गुन्हा केला हा प्रश्न कायम सतावत राहतो. दुसऱ्या बाजूला या सगळ्या कोर्ट कचेऱ्यांच्या प्रक्रियेत विष्णूच्या घरच्यांनी आजपर्यंत केलेल्या सेव्हिंग्जचे सगळे पैसे संपून जातात. घरची परिस्थिती आधीच बेताची असताना आणखीनच बिकट होऊन जाते. जेलमध्ये गेल्यानंतरसुद्धा विष्णुला कोणाला भेटू दिलं जातं नाही. पण या सगळ्यात विष्णू लोवर कोर्ट मध्ये जरी त्याची केस हरला असला तरी त्याला हायकोर्टात अपील करायला संधी होती. पण मघाशी सांगितल्याप्रमाण विष्णु एका साध्या कुटुंबात जन्माला आलेला होता. हाय कोर्टात अपील करण्यासाठी त्याच्याकडे साधे पैसेही नव्हते वरून वकिलांची फी वेगळीच. पण तरीसुद्धा विष्णुच्या घरचे स्वतःच्या घरची जमीन विकून अलाहाबाद कोर्टात अपील करतात. पुढे 1 वर्ष उलटत, 2 वर्ष उलटतात, 5 वर्ष उलटतात तरीही विष्णुच्या केसचा नंबर येत नाही. या दरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी घडतात. जेलमध्ये असताना विष्णूचे वडील प्रत्येक महिन्यात त्याला भेटायला येत असायचे.

(Vishnu Tiwari Case Study)
खरंतर तोच एक विष्णुसाठी आशेचा किरण होता. पण त्याच्या वडिलांनासुद्धा त्याला जेलमध्ये फार कमीच वेळ भेटू दिलं जायचं. पण तरीही त्याचे वडील प्रत्येक महिन्याला त्याला भेटायला यायचेच. याचंदरम्यान 2014 साली त्याच्या वडिलांना paralysis होतो.सगळे पैसे विष्णूच्या कोर्ट कचेऱ्यांच्या खर्चासाठी गेल्यामुळे वडिलांच्या उपचारासाठी सुद्धा त्याच्या कुटुंबाकडे पैसे राहत नाहीत. पुढच्या एकचं महिन्यात विष्णूच्या वडिलांचा मृत्यू होतो. इकडे विष्णू त्याचे वडील त्याला भेटायला आले नाहीत म्हणून चिंतेत असतो. एक महिना, 2 महिने, 3 महिने उलटतात पण त्याचे वडील काय त्याला भेटायलाच येत नाहीत. अखेर 6 महिन्यांनी त्याला त्याच्या गावावरून एक पत्र येत. गावातलाच त्याच्या ओळखीचा एक माणूस 6 महिन्यापूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची बातमी त्या पत्रादवारे कळवतो. विष्णूला जेंव्हा हे समजत तेंव्हा तो पुरता कोसळतो आणि पेरोलवर जेलबाहेर येण्याची मागणी करतो. पण त्याची ही मागणी सुद्धा फेटाळली जाते. त्यानंतर 2018 पर्यंत त्याला कोणालाचं भेटू दिलं जातं नाही. या सगळ्या काळात त्याला बेल सुद्धा मिळत नाही किंवा कधीच पेरोलवरती बाहेरही सोडलं जातं नाही. दिवसांमागून दिवस जातात पण विष्णू तिवारी जेलमध्येच राहतो. बाहेरच्या जगात बऱ्याच घटना घडून गेलेल्या असतात. पण त्याला मात्र याबाबतीत काहीचं माहिती नसतं. कारण कित्येक वर्ष त्याला कोणालाच भेटायची परवानगी दिली जातं नाही.
(Vishnu Tiwari Case Study)
अशातच 2018 साल उजाडत आणि विष्णुच्या घरच्या एका सदस्याला विष्णुला भेटण्याची परवानगी दिली जाते. जसं विष्णुला समजत कीं आपल्याला कोणीतरी भेटायला आलंय. हे ऐकून विष्णू खूप खुश होतो. त्यावेळी आग्रा जेलमध्ये विष्णुला त्याचा छोटा भाऊ महादेव भेटायला आलेला असतो. पण जसं तो महादेवला भेटतो तस विष्णुवर दुःखाचा डोंगरच कोसळतो. 2014 साली जेंव्हा त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो त्यानंतर पुढच्या एका वर्षातच त्याची आई सुद्धा देवाघरी गेलेली असते आणि त्यांनतर पुढच्या काही काळातचं त्याच्या दोन्ही भावांचा सुद्धा हार्ट अटॅकने मृत्यू झालेला असतो. हे सगळं ऐकून विष्णू पुरता खचतो. आपल्या बाबतीत हे काय होतय हे त्याचं त्यालाचं समजत नाही. विष्णू हतबल होतो आणि तसही हतबल होण्यापलीकडे त्याच्या हातातसुद्धा काहींचं उरलेलं नसत. तो स्वतःला कोसत राहतो कीं मी नक्की कोणता गुन्हा केलाय ? मला साधं माझ्या आई वडिलांच शेवटचं दर्शनसुद्धा घेता आलं नाही की माझ्या दोन्ही भावांच्या प्रेताला खांदा देता आला नाही. तो त्याचा बराच काळ या सगळ्या दुःखामध्ये घालवतो. आता विष्णुला जेलमध्ये जाऊन तब्बल 19 वर्ष उलटून गेलेली असतात आणि दुसऱ्या बाजूला हायकोर्टात अपील करून सुद्धा जवळपास 15 वर्ष होतं आलेली असतात. कदाचित तेंव्हा त्यानं अपील केलेली कागदपत्र सुद्धा कोर्टाच्या कुठल्या तरी कबाडखान्यात धूळ खात पडलेली असतील. जस जसा काळ लोटतो तसा विष्णू तिवारी आपल्या सूटकेच्या आशा खरंतर सोडूनच देतो. आता आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत जेलमध्येच रहावं लागणार असं विष्णूला वाटतं.
तो पुरता खचून गेलेला असतो. पण 2020 मध्ये असं काही घडतं ज्यामुळे विष्णुच्या आयुष्यात एकदम उलथापालथ होते. जेल प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याची विष्णू तिवारीवरती नजर पडते. विष्णुच्या वागणुकीमुळे ते त्याच्यावर खूप खुश असतात. याच कारणामुळे विष्णुबाबतीत ते आणखी माहिती गोळा करू लागतात. तेंव्हा त्यांना समजत कीं विष्णू गेले 20 वर्ष झालं बलात्काराच्या केसची शिक्षा भोगतोय आणि इतक्या वर्ष झालं त्याला एकदाही बेल मिळालेली नाहीये किंवा त्याला पेरोलवर बाहेर जाऊ दिलेलं नाहीये. इकडे तिकडे चौकशी करून त्या जेल अधिकाऱ्याला विष्णूचा A टू Z बायोडाटा समजतो.

(Vishnu Tiwari Case Study)
विष्णुच्या आयुष्यात घडलेल्या एकूणच सगळ्या गोष्टी त्याला समजतात. एवढंच काय तर जेंव्हा ते त्याच्या केसबद्दल अधिकची माहिती घेतात तेंव्हा त्यांना त्यात बऱ्याच त्रुटीही आढळून येतात. त्यानंतर तो जेल अथॉरिटीमार्फत स्टेट लीगल अथॉरिटी सर्व्हिसला याबाबतीत माहिती देतो. त्यानंतर मग या केसबद्दल संपूर्ण माहिती घेऊन स्टेट लीगल अथॉरिटी सर्व्हिस विष्णूच्या केसमध्ये दखल देते आणि विष्णू तिवारीची कित्येक वर्ष धूळ खात पडलेली फाईल बाहेर निघते. त्यानंतर बऱ्याच प्रदीर्घ काळानंतर 2020 मध्ये अलाहाबाद हायकोर्टात या केसची सगळ्यात पहिल्यांदा सुनावणी पार पडते. पुढेही बराच काळ या केसबाबत कोर्टात बऱ्याच सुनावण्या पार पडतात. या केसमध्ये कोर्टालासुद्धा बऱ्याच त्रुटी आढळून येतात. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर 2000 साली ज्या तारखेला ती महिला पोलीस स्टेशन मध्ये गेली होती त्यादिवशी FIR नोंद झालीच नव्हती. FIR ही त्या तारखेच्या 2-3 दिवसानंतर नोंदवली गेली होती. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या प्रकरणात या केसची FIR ही त्या महिलेनं स्वतः नोंद केली होती असं कायम म्हणलं गेलं होतं.
(Vishnu Tiwari Case Study)
पण हायकोर्टातल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने असं नोटीस केलं कीं FIR ही त्या महिलेनं नाही तर त्या महिलेच्या नवऱ्याने आणि सासर्याने नोंद केली होती. तिसरी गोष्ट म्हणजे स्थानिक कोर्टात पोलिसांनी एकही पूरावा सादर केला नव्हता तर फक्त पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटच्या आधारे विष्णुला शिक्षा देण्यात आली होती. याव्यतिरिक्त त्या महिलेच्या मेडिकल रिपोर्ट मध्ये बलात्कार केल्यासारखं काहींचं आढळलेलं नव्हतं. जसं कीं तिच्या प्रायव्हेट पार्ट वर जखमा नव्हत्या कीं झटापटीच्या खुणा. पण तरीसुद्धा विष्णू तिवारीच्या विरोधात हा निकाल देण्यात आला होता. शेवटी मग या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर ठेऊन अलाहाबाद कोर्टाचे जस्टीस कौशल ठाकूर आणि जस्टीस गौतम चौधरी या केसमध्ये विष्णू तिवारीला निर्दोष मानतात आणि अखेर 19 वर्ष 3 महिने आणि 3 दिवसानंतर विष्णू तिवारीची जेलमधून सुटका करण्यात येते. संपूर्ण कागदी कारवाई पूर्ण करून 2 मार्च 2021 रोजी विष्णू तिवारीला जेलमधून बाहेर सोडलं जातं. जेलमधून बाहेर पडताना त्याच्या हातात दोन बॅग आणि त्यानं 20 वर्ष जेलमध्ये राहून जे आचाऱ्याचं काम केलं होतं त्याचे मिळालेले 600 रुपये असतात. ते घेऊन तो एका नव्या दुनियेत प्रवेश करतो ज्या दुनियेत त्याचं स्वतःचं असं कोणीच उरलेलं नसतं. विष्णू जेंव्हा जेलमध्ये जातो तेंव्हा त्याचं वय असतं 23 वर्ष आणि जेंव्हा तो जेलमधून बाहेर पडतो तेंव्हा तो 43 वर्षाचा झालेला असतो. मंडळी खरं तर या वीस वर्षात विष्णू तिवारीनं काय गमावलं असा आपण विचार केला तर त्याची लिस्ट खूप मोठीय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यानं त्याच्या आयुष्याचे महत्वाचे असे 20 वर्ष गमावले. कोर्ट कचेरीच्या पाई त्यांन त्याची संपत्ती गमावली. विष्णू जेलमध्ये जाण्याच्या अगोदर त्याचं अगदी हसत खेळत कुटुंब होतं. पण या सगळया दरम्यान त्यानं त्याच्या आई वडिलांना आणि दोन भावांना गमावलं होतं. पण आता ह्ये सगळं प्रकरण समजावून घेतल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असेल की नेमकं त्या महिलेने विष्णुवर असे खोटे आरोप मग का केले?

(Vishnu Tiwari Case Study)
तर बघा त्या दोन्ही कुटुंबात पहिल्यापासूनचं जमिनीवरून आणि शेतात जनावर बांधण्यावरून वाद होते. या कारणावरून दोन्ही कुटुंबात बरेच वाद व्हायचे. असाच एक वाद 2000 सालच्या नोव्हेंबर महिन्यात झाला होता. याचं वादावरून ती महिला ललितपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली. सुरुवातीला तर तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. पण त्याच्या 2 ते 3 दिवसानंतरच तिचा नवरा आणि सासरे काही स्थानिक नेत्यांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आले आणि पॉलिटिकल दबाव टाकून पोलिसांना तक्रार नोंदवून घ्यायला सांगितली. याचं खोट्या तक्रारीमुळे विष्णुला 20 वर्षांची जेल होते. या सगळ्या प्रकरणात sc st act चा दुरुपयोग करण्यात आलाय हे कोर्टाच्या लक्षात येत आणि कोर्ट विष्णुची निर्दोष मुक्तता करत. मंडळी या सगळ्या घटनेनंतर विष्णू त्याच्या एका मुलाखतीत सांगतो कीं.
जेलमध्ये मला खूपदा स्वतः ला संपवू वाटलं पण मी तसं केलं नाही कारण मी मेलो तर माझ्याबरोबर माझं सत्य सुद्धा मरून जाईल. मला आशा होती की एक ना एक दिवस मी निर्दोष आहे हे जगाला कळेल आणि माझ्यावरचा बलात्कारी असल्याचा डाग कायमचा पुसला जाईल.
(Vishnu Tiwari Case Study)
पुढे विष्णू जेलच्या बाहेर आला आणि त्यानं त्याचं चांगल आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला पण विशेष म्हणजे यानंतर सुद्धा संकटानी त्याचा पिच्छा सोडला नाही. मंडळी जेलमधून बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्याला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागलं. तर त्याचं झालं असं कीं जेलमधून बाहेर आल्यानंतर विष्णून आपलं विस्कटलेलं आयुष्य ठीक करण्यासाठी लग्न करायचं ठरवलं. त्याबाबतीत त्याला एक स्थळ सुद्धा आलं. मग दोघांची पसंती झाल्यानंतर विष्णून 22 जुलै 2022 रोजी हिंदू पद्धतीने लग्नं केलं. पण लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्याची बायको घरातले पैसे आणि दागदागिने घेऊन पळून गेली. त्यांनतर असं समजत कीं ती मुलगी एक लूटमार करणारी मुलगी होती. तिने आणि तिच्या आईनं आजपर्यंत अनेक जणांना फसवलेलं होतं. पण एवढं सगळं होऊन सुद्धा अजूनही विष्णूनं धीर सोडलेला नाहीये. त्याचा स्वयंपाकात हातखंडा असल्यामुळे तो आचाऱ्याचं काम करून पोट भरतोय. त्यानं त्याची आशा अजून सोडलेली नाहीये. अनेकांनी या सगळ्या प्रकरणात विष्णू तिवारीला भरपाई मिळावी अशी मागणी केली होती. अगदीच त्यासंदर्भात कोर्टात अपील सुद्धा करण्यात आलं होतं. पण कोर्टाने या सगळ्या गोष्टी राज्य आणि केंद्रसरकारच्या आखत्यारीत येतात असं सांगितलं आणि दोन्ही सरकारांना याबाबतीत नियम बनवण्यासाठी सूचना सुद्धा केल्या.

(Vishnu Tiwari Case Study)
हे विषयच भारी वाचलेस का भावा !
- पॅन कार्ड क्लबनं 51 लाख लोकांना गंडवून 7000 कोटींचा घोटाळा कसा केला | Pan Card Club Fraud | Refund Process
- एका रात्रीत बार डान्सरवर 93 लाख उधळणाऱ्या Abdul Karim Telgi ची गोष्ट | Scam 2003 | Real Telgi Story | Vishaych Bhari
- Rajiv Gandhi यांची हत्या केलेली नलिनी सध्या काय करते | Rajiv Gandhi Death Conspiracy
पण मंडळी विष्णुची या सगळ्या प्रकरणात काय चूक होती ? एका बाजूला त्याची निर्दोष म्हणून मुक्तता झाली, त्याच्यावर असलेला बलात्कार असल्याचा डाग निघाला पण मग 20 वर्ष जेलमध्ये त्यानं कोणत्या गोष्टीची शिक्षा भोगली ? त्यानं त्याच्या उमेदीची सगळी वर्ष जेलमध्ये घालवली. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगली. का तर त्याच्याकडे वकील द्यायला पैसे नाहीत म्हणून की मोठ्या लेव्हलला त्याची ओळख नाही म्हणून. बरं विष्णू तिवारी असा एकटाच आहे की असे अजून किती जण जेलमध्ये आपल्या केसच्या नंबरची वाट बघत अजूनही बसले असतील ? ही न्यायव्यवस्थेची चूक म्हणायची की सरकारची ? याला नेमकं जबाबदार कोणंय? तुम्हाला नेमकं काय वाटतंय त्ये आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
Leave a Reply