जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यामुळे हे ३ नेते डॅमेज झालेत | Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari


मी जातवान मराठ्याचा पोरगा आहे, मी माझ्या मराठा बांधवांशी गद्दारी करणार नाही. माझ्या मराठा समाजाला मी मायबाप मानलंय, त्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मराठा आरक्षणासाठी ज्या ५०-५५ आत्महत्या आतापर्यंत झाल्या त्या सरकारच्या हलगर्जीपणामुळे झाल्यात, याचं भान सरकारला आहे का? आंदोलन करून कुठल्या एखाद्या मंत्र्याचा मिंधा झालो असतो तर समाजाने माझ्यासाठी एवढी गर्दी केलीच नसती. राज्याचं अख्खं मंत्रिमंडळ माझ्या आंदोलनाच्या शेजारी बसून होतं, पण त्यांच्या भूलथापांना मी बळी पडलो नाही. आंतरवली सराटीच्या बाहेर माझं काही चालणार नाही असं म्हणणारे लोक कुठंयत त्यांना बोलवा इकडे पुण्यात, साताऱ्यात, त्यांना कळेल माझा समाज आज माझ्या पाठीशी कसा ठामपणे उभा राहिलाय ते..! राज्यात ज्या ज्या पक्षांनी सत्ता उपभोगली त्या पक्षाला, त्याच्या नेत्याला मग त्यो कुठल्याही जाती-धर्माचा असो, माझ्या मराठा माय-बापाने मतदान देऊन मोठं केलंय.. त्यामुळं आता आम्हाला गरज आहे तर आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते आम्ही घेणारच..! २४ तारखेपर्यंत आम्ही आरक्षणाविषयी आमच्या बांधवांना शहाणं करू, तुम्हालाही काय बोलायचं ते बोलून घ्या..त्यानंतर मात्र आम्ही मराठे शांततेच्या मार्गाने जे काही करू ते सोसण्याची तयारी ठेवा..!! मराठा आरक्षणासाठी इथून पुढं कुणीही आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका, आपण लढू आणि आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे न हटण्याची शपथ घेऊ..! लढू आणि आरक्षण मिळवूच..!

Manoj Jarange Patil

२० ऑक्टोबर २०२३ रोजी दिवसभर पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या भाषणातील ही ठळक वाक्यं. राज्यातील मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या आणि त्यांचा ओबीसी आरक्षणात समावेश करा ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटलांनी मागचे पावणेदोन महिने अक्षरशः महाराष्ट्र ढवळून काढला आहे. माध्यमांच्या चर्चेची सगळीच स्पेस मनोज जरांगेनी व्यापली आहे. एका सर्वसामान्य मराठा कार्यकर्त्याच्या सभेला लाखोंच्या संख्येने गर्दी होतेय ही गोष्ट महाराष्ट्र नव्याने अनुभवत आहे. आंतरवली सराटी येथील सभा ही तर राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी सभा म्हणावी लागेल. १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांचा प्रवास करून आंतरवली सराटी येथे भव्यदिव्य सभा घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी चारच दिवसांत आपला मोर्चा मुंबईकडे वळवला. मुंबईतील मराठी माध्यमांच्या ऑफिसला भेटीगाठी देऊन त्यांनी आपली आरक्षणाची मागणी संपूर्ण राज्याचा विचार करून केली गेली असल्याचं स्पष्टपणे सांगितलं. प्रत्येक चॅनेलला त्यांनी जवळपास पाऊण ते एक तासाची सविस्तर मुलाखत दिली. मुंबईतील मराठा जात-बांधवांच्या भेटीगाठीही घेतल्या. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी जरांगे यांनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला. पुणे जिल्ह्यात शिवनेरी, खेड, राजगुरुनगर, बारामती तर सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर, दहिवडी या ठिकाणी भेट देण्याचं नियोजन जरांगे पाटलांनी केलं. माळी, धनगर, मराठा अशा सर्वच समाजबांधवांची मोठी संख्या असलेले हे पश्चिम महाराष्ट्रातले भाग. नियोजित वेळेपेक्षा ३-४ तास पोहोचायला उशीर झाला तरी लोकांची सभेला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. या सभांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील १७५ मराठा-कुणबी आमदारांना टार्गेट करण्यासोबतच सरकारला धारेवर धरण्याचं काम मनोज जरांगे यांनी केलंय. त्यामुळं जरांगे यांच्या या भव्यदिव्य सभांच्या उद्रेकाचे परिणाम कुणाला भोगावे लागतील याचाच थोडक्यात घेतलेलाआढावा .

Manoj Jarange Patil

(Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari)

मनोज जरांगे यांच्या सभांमधून आतापर्यंत टार्गेट गेलेले ३ महत्त्वाचे नेते आहेत ते म्हणजे छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही पण त्यांनी ते ओबीसीमधून मागू नये अशी जाहीर मागणी छगन भुजबळ वारंवार करताना दिसतायत. आंतरवली सराटी येथे पोलिसांकडून लाठीचार्ज झाल्यानंतर मनोज जरांगे ज्यावेळी या सर्व प्रकरणाच्या केंद्रस्थानी आले, तेव्हापासून छगन भुजबळ या प्रकारची मागणी करत आहेत. जरांगेंच्या आंदोलनाला पैसे कुठून येतायत? अशी टिप्पणीही त्यांनी केली. या सगळ्या टिप्पणीनंतर जरांगे यांनी भुजबळ यांचा पुरता समाचार घेतला. कुणबी म्हणून आम्ही आधीपासूनच आरक्षणात आहोत, त्यामुळं ओबीसींना बिल्कुल घाबरण्याचं कारण नाही म्हणत जरांगे यांनी भुजबळ यांचे वार परतावून लावले. ओबीसी आणि मराठ्यांच्यात फूट पाडणं थांबवा असा सज्जड दम त्यांनी भुजबळांना दिला. राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांना निवडून येण्यासाठी मराठा समाजाने मदत केली असून आता आमच्या वाटणीचं आरक्षण आम्हाला मिळू द्या, त्यात आडवे येऊ नका हीच भूमिका जरांगे यांनी वेळोवेळी मांडली आहे. जरांगे विरुद्ध भुजबळ असा वाद इथून पुढे कायम राहिला तर त्याचा मोठा फटका येत्या निवडणुकीत भुजबळ समर्थक ओबीसी उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

(Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari)


भुजबळ हे सध्या अजित पवार गटासोबत असल्याने साहजिकच हा फटका त्यांच्या गटालाही बसू शकतो. विशेषत जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्रातील दौर्‍यामुळे अजित दादांची इथली मराठा सेंट्रिक मतदारांची लाॅबी त्यांच्या पासुन दुरावू शकते.या यादीत दुसरं नाव येतं ते देवेंद्र फडणवीस यांचं. २०१४ ला राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्याचं धोरण देवेंद्र फडणवीस यांनी हातात घेतलं होतं. राजघराण्यातील माणसं असुदेत किंवा पिढ्यानपिढ्या सत्ता उपभोगलेले स्ट्रॉंग मराठामॅन.. या सर्वांना स्वतःच्या जवळ करण्याचं राजकारण फडणवीस यांनी केलं. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मूक मोर्चेही निघाले. त्यानंतर मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणून आरक्षणही मिळालं. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे ते अल्पावधीचंच ठरलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारनं सांगितल्यामुळंच मी मराठा आरक्षणाच्या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद केला नाही,’ असा खुलासा महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला होता. त्यामुळं फडणवीस यांची आरक्षणाविषयीची भूमिका संदिग्ध वाटत राहिली. यावर्षी आंतरवली सराटी येथे आंदोलकांवर झालेल्या पोलीस लाठीचार्जनंतर फडणवीस यांनी बेजबाबदार विधान केलं आणि तेसुद्धा जरांगे यांच्या रडारवर आले. राज्याच्या गृहमंत्र्याला काही कळतं का, अशा शेलक्या भाषेत त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यानंतर मागील महिनाभराच्या काळातही फडणवीस मराठा आरक्षणावर आश्वासक असं काही बोलले नाहीत. उलट त्यांचा पाठिंबा असलेले वकील म्हणून ज्यांची ख्याती आहे, ते गुणरत्न सदावर्ते सध्या जरांगे यांना डीवचण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. जरांगे यांची सभा म्हणजे जत्रा आहे, तिथं जाऊन फक्त मजा बघायची, मराठा समाजाला आरक्षण मिळालं तरी ते टिकणार नाही, जरांगे यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे अशा प्रकारची विधानं सदावर्ते यांनी नुकतीच केली. यावरून जरांगे यांनी सदावर्ते आणि फडणवीस या दोघांना टार्गेट केलं आहे. जरांगे यांच्या मोठ्या सभांचा आणि त्यातील मराठा समाजबांधवांना केलेल्या आवाहनाचा फटका त्यामुळं फडणवीस आणि पर्यायाने भाजपला बसू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात ज्या मराठा मतदारांवर भाजप विसंबून आहे तोच factor जरांगे पाटलांच्या झंझावाती सभांमुळे भाजपपासून दुरावू शकतो.

Chhagan Bhujbal
Manoj Jarange Patil

(Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari)

या यादीतील तिसरं आणि महत्त्वाचं नाव आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं. आरक्षण देण्यासाठी सरकारने स्वतःहून जरांगे यांच्याकडे एक महिन्याचा वेळ मागून घेतला होता. ती मुदत जरांगे पाटील यांनी १० दिवसांनी वाढवून दिली होती. येत्या २४ तारखेला ही मुदत संपेल. सरकारच्या एकूण वागण्यामुळे मनोज जरांगे पाटलांना हिरो बनायला वाव मिळाला ही गोष्ट एका बाजूने खरी म्हणावी लागेल. इतर प्रस्थापित मराठा नेत्यांना कमी लेखून जरांगे यांची इमेज लार्जर दॅन लाईफ करण्याचा प्रयत्न सरकार करतय का अशी शंका घ्यायलासुद्धा वाव आहेच. कारण त्याशिवाय इतक्या मोठ्या सभांचं मॅनेजमेंट कसं शक्य होणार होतं? हा प्रश्नही अनेकांना पडतोय. मात्र यदाकदाचित ही सरकारची खेळी असेल असं म्हणायला गेलं तरी जरांगे पाटील जे आवाहन करतायत त्यावरून तरी सरकारच्या दिरंगाईचा रोषच अधिक व्यक्त होताना दिसत आहे. एवढं क्रूर आणि निर्दयी सरकार बघितलं नव्हतं, सरकारला आमच्या वेदनांची किंमत नाही, उपाशी तापाशी आंदोलनाला बसलेल्या लोकांना त्रास देण्याचं, त्यांची डोकी फोडण्याचं पाप सरकारने केलंय याचा बदला मराठा बांधव घेतीलच. आता आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही असं म्हणत जरांगे यांनी शिंदे यांना एकप्रकारे कोंडीतच पकडलं आहे. सरसकट आरक्षणाचा मुद्दा एकनाथ शिंदे कसा मार्गी लावणार आहेत याबद्दल कळायला मार्ग नाही. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं शिवधनुष्य शिंदे सरकारला पेलावं लागणार आहे. पण या सगळ्यात राजकीय दृष्ट्या शिंदे गटाला मोठा फटका बसू शकेल. आधीच अपात्रतेची टांगती तलवार, त्यात गद्दारीचं परसेप्शन,यात मराठा विरोधाची अजून एक भर म्हणजे शिंदे गटासाठी मोठी डोकेदुखी होईल. आता त्यामुळेच राज्यातील मराठा समाजाच्या सर्वच प्रस्थापित नेत्यांनी सध्या वेट आणि वॉच हीच भूमिका घेतली आहे. कुणी काहीही बोलायला तयार नाही. शरद पवार शांतपणे काही माध्यमांना मुलाखती देऊन आरक्षणाच्या जुन्या-नव्या मागण्यांची मांडणी आणि शक्यता सांगत आहेत. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा मुद्दा बोलत आहेत. ओबीसीतून आरक्षण शक्य नाही हे सांगत आहेत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यासाठीचे मोर्चे, आंदोलन पाहिलेले सर्वात अनुभवी नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहता येतं. सगळ्याच समस्यांचे तोडगे किंवा निर्णय भावनिक होऊन घेतले जात नाहीत याची जाणीव पवारांना आहे.

(Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari)


त्यांनी दाखवलेला संयम आणि मुरब्बीपणा शिंदे, फडणवीस यांना दाखवता आलेला नाही. शरद पवारांनी मराठा आणि ओबीसी अशा दोन्ही बाजूने सॉफ्ट भूमिका घेतली आहे.‌ पण फडणवीसांनी ओबीसी उपोषणाला भेट देऊन ओबीसी सेंट्रिक खुंटा बळकट करायचा प्रयत्न केला असला तरीही त्यामुळे ते मराठा समाजाच्या डोळ्यावर आले आहेत. इकडं आरक्षण देण्यात सरकार अपयशी ठरलं तर त्याचा फायदा शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला होण्याची शक्यता अधिक आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना मराठवाड्यातील कुणा राजकारणी किंवा इतर व्यक्तीकडून डॅमेज होण्याची इतकी भीती याआधी नव्हती. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे ती थोडी का होईना वाटू लागली आहे एवढं नक्की..! प्रस्थापित मराठा विरुद्ध सामान्य धडपड्या मराठा अशा भविष्यातील लढाईची कदाचित ही नांदी असू शकेल. पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील एंट्रीमुळे शरद पवार गटाचा मराठासेंट्रिक राजकारणाचा खुंटा अधिक बळकट होणार की मग काही वेगळी समीकरणं तयार होणार,हे पहावं लागेल.

Manoj Jarange Patil ,
Gunaratna Sadavarte,

(Manoj Jarange Patil Live | Vishaych Bhari)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

आज त्यांची राजगुरूनगर,फलटण येथेही सभा पार पडली. राजगुरुनगरमध्ये एका तरुणाने जरांगे पाटलांच्या हातून माईक हिसकावुन घेतला. दुसरीकडे सदावर्ते,राणेंनीही जरांगे पाटलांना damage करायला सुरुवात केलीय. आता जरांगेंना मिळणारा जनाधार हा या सगळ्या राजकारण्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. त्याचा फायदा कोणाला,तोटा कोणाला,याचं गणित लवकरच लक्षात येईल. सोबतच २४ ऑक्टोंबर नंतर जरांगे पाटलांच्या आंदोलनाची दिशाही स्पष्ट होईल. आपण या सगळ्यावर लक्ष ठेवून राहूच. बाकी तुम्हाला काय वाटतंय? मनोज जरांगे यांच्या या भव्यदिव्य आंदोलनाचा तोटा कुणाला होईल ? शरद पवार गट की फडणवीस, एकनाथ शिंदेना? सदावर्ते म्हणतायत तसं खरंच जरांगे पाटील यांचे political boss हे शरद पवार आहेत कि मग सत्य अजून वेगळंय? तुमचं मत कमेंटबॉक्स मध्ये जरूर कळवा.

जरांगे पाटलांच्या पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यामुळे हे ३ नेते डॅमेज झालेत | Manoj Jarange Patil Live

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *