सातारचा ह्यो फाकड्या मराठी सिनेसृष्टीचा राजा गोसावी कसा झाला | Raja Gosavi Biography| Vishaych Bhari


सडपातळ बांधा, बांध्याच्या मानानं कापड मात्र अगदीच ढगळी, चपळ देहबोली, जाड भुवया, मोठे पण तितकेच बोलके डोळे, चेहऱ्यावरचं तरतरीत नाक, उंची तशी साधी पण मराठी रंगभूमी आणि सिनेमांमध्ये त्यांनी गाठलेली अभिनयाची उंची मात्र आत्तापर्यंत कुणीच गाठू शकलेलं नाहीये. १९५० आणि त्यापुढच्या काळातल्या अनेक मराठी कलाकृती या नटानं त्यांच्या अभिनयानं गाजवल्या.   अस्सल सातारी रांगड्या भाषेनं त्यांनी आपल्या अभिनयात रंग भरले. मंडळी या राजा माणसाला आपण सगळेच राजाराम गोसावी या नावानं ओळखतो. फक्त चौथी शिकलेला हा नट स्वतःला बी.ए. म्हणवायचा म्हणजेच अगदी त्यांच्याचं भाषेत सांगायला गेलं तर बॉर्न आर्टिस्ट. मंडळी आज आपण बोलणार आहोत मराठी मायबोलीच्या एका अस्सल गावरान ठसक्याबद्दल ज्यांनी त्यांच्या अभिनयातून मराठी चित्रपटसृष्टीला बहर आणली अशा नाट्यअभिनेते राजा गोसावी म्हणजेच राजाराम शंकर गोसावी यांच्याविषयी.

Raja Gosavi

(Raja Gosavi Biography| Vishaych Bhar)


मंडळी तुम्ही ” असला नवरा नको गं बाई ” हा सिनेमा तुम्ही नक्कीचं बघितला असलं. त्यातला रंजना आणि राजा गोसावी यांचा जेवणाच्या टेबलवरचा तो सीन आठवा. रंजना त्यांच्या मोलकर्णीना म्हणजेच गंगूला नाष्ट्यासाठी सूप आणायला पाठवते. तेंव्हा राजा गोसावी म्हणतात ” सूप, आयला मामा म्हणजे आजून सयपाकाचा पत्या नाय, म्हणजे इथनं म्होरं अजून तांदूळ पाखडायचं, त्ये शिजवायचं, मग आम्ही खायाचं ” त्यानंतर जेंव्हा त्यांच्यासमोर सूप येत तेंव्हा त्ये म्हणतातं ” आयला मामा ह्या तर मक्याच्या कण्या हायत, शहरकडची लोकं याला सूप म्हणत्यात व्हय ” असाचं पुढे त्या सिनेमातला हा सीन रंगतो आन गावाकडचा माणूस जेंव्हा शहरात जातो तेंव्हा त्याची काय अवस्था होते आणि त्यातून जो हशा पिकतो त्याला तोडच. अजूनही सोशल मीडियावर राजा गोसाविंचा हा सीन वायरल होतं असतो. ह्येच ते राजा गोसावी ज्यांनी साताऱ्याच्या खटाव तालुक्यातल्या सिद्धेश्वर कुरोली सारख्या दुषकाळी पट्ट्यातन शहराच्या ठिकाणी जाऊन अभिनयं क्षेत्रात आपलं नाव कोरलं. मंडळी २८ मार्च १९२५ मध्ये शुरांची वीरांची भूमी म्हणवल्या गेलेल्या साताऱ्यात जन्माला आलेला हा अवलिया उराशी आपल्याला फक्त आणि फक्त अभिनयच करायचाय हेच  स्वप्न बाळगून आयुष्यभर झटला.  झटला असं का म्हणतोय तर त्याचं कारण म्हणजे अभिनय क्षेत्रात काहीच आगापिछा नसताना फक्त अभिनयाचाचं ध्यास घेतलेल्या राजा गोसावी यांना पुढं जाऊन काय काय संघर्ष करावा लागेल, याची अजिबात कल्पना नव्हती. त्यांचं वय जसं जसं तारूण्यात आलं, तसं तस आपल्याला फक्त अभिनयच करायचायं, हेचं त्यांचं एकमेव ध्येय बनलं. यासाठी या सातारच्या पठ्ठ्यानं एक नामी शक्कल लढवली. हा तरूण कुठं काम मिळतंय का हे शोधत शोधत पहिल्यांदा पोहोचला ते, मास्टर विनायक यांच्या घरी आणि ते सुद्धा त्यांच्या घरी घरगड्याचं काम करायला म्हणून. का तर घरी असताना मास्टरं विनायक यांना त्यांच्या अभिनयाची चुणूक दाखवता येईल म्हणून. आणि पुढे जाऊन याचं मास्टरं विनायक यांच्या मुलीसोबतं त्यांनी हिरो म्हणून स्क्रिन शेअर केली.

(Raja Gosavi Biography| Vishaych Bhar)

मंडळी “एखादं ध्येय गाठायंचं असेल , तर ते गाठताना अडथळ्यांना पण सामोरं गेलं पाहिजे” या नीतीनं त्यांनी कायम आपल्या आयुष्याकडे पाहिलं आणि तसं ते प्रत्यक्षातसुद्धा जगले. अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी धडपड करताना, त्यांनी कधीचं कुठल्याच कामाला नाही म्हटलं नाही. पडेल ते काम केलं. प्रफुल्ल पिक्चर्ससाठी अगदी सुरूवातीला ऑफिसबॉय म्हणून लाकडी कामांसाठी सुतार म्हणून अशी जी पडतील ती कामं त्यांनी केली. कधी कधी तर मेकअपमॅन म्हणू नका किंवा अगदी प्रकाशयोजना करण्यासाठी लाईटमॅनच्या कामाला सुद्धा त्यांनी नाही म्हटलं नाही. एवढंच काय तर अनेक नाटकात तर त्यांनी प्रॉम्टरंचसुद्धा काम केलं. अजूनच सांगायचं झालं तर पुण्याच्या भानुविलास थिएटरबाहेर त्यांनी तिकिटं विकण्याचंसुद्धा काम केलं. पण म्हणतात ना प्रयत्न करणाऱ्याला कुणीही थांबवू शकत नाही, असंच काहीसं पुढं घडलं. अभिनयाव्यतिरिक्त जी कामं अंगावर पडतील ती कामं ते करत गेले, इंडस्ट्रिमधल्या सगळ्यांना त्यांच्या ॲक्टिंगविषयीची तळमळ माहित होती आणि यामुळेच त्यांना एका छोट्याश्या भुमिकेसाठी काम करण्याची संधी मिळाली. मंडळी भावबंधन या नाटकामध्ये त्यांना रखवालदाराची भुमिका करायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या अभिनयात डेब्यु केला.  म्हणजे कमी तिथे आम्ही असं म्हणत त्यांनी अभिनय क्षेत्रात एन्ट्री मिळवलीच, नाय का ? आणि तसही त्या छोट्याश्या संधीचं सोनं न करतील ते राजा गोसावी कसले, त्यांनी शेवटी मराठी सिनेमांतल्या दिग्गजांना त्यांच्या अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडलंचं आणि शेवटी त्यांचं अखेर जमलंच. म्हणजे १९५२ मध्ये दत्ता धर्माधिकारी दिग्दर्शित राजा गोसावींचा पहिलावहिला सिनेमा ‘अखेर जमलं’ हा प्रदर्शित झाला आणि हा कलाकार मोठ्या पडद्यावर झळकला.

Raja Gosavi

(Raja Gosavi Biography| Vishaych Bhar)

सुप्रसिद्ध कथाकार मधुसुदन कालेलकर यांनी पटकथा लिहिलेला हा पहिलाच सिनेमा होता आणि दुसरं म्हणजे ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचाही हा पहिलाच सिनेमा होता. त्यानंतर शरद तळवलकर आणि राजाराम गोसावी ही जोडगोळी, त्याकाळच्या रसिकप्रेक्षकांना जवळची वाटू लागली आणि त्यामुळे पुढे ही जोडी अनेक सिनेमामध्ये धम्माल उडवताना दिसली. जिद्दीनं पेटलेलं हे वादळ आता थांबणारं नव्हतं. राजा गोसावींना आता हळू हळू कामं मिळायला सुरूवात झाली होती. मिळतील ती कामं करणारा हा अभिनेता आता सिनेमे साईन करायला लागला होता. त्यानंतर राजा गोसावींचा प्रदर्शित झालेला ‘लाखाची गोष्ट’ हा सिनेमा जेव्हा पुण्याच्या भाानुविलास थिएटरला प्रदर्शित झाला, त्यावेळीसुद्धा राजा गोसावींनी त्या सिनेमाची सगळी तिकीटं स्वतः विकली होती आणि गंमत म्हणजे यामध्ये कमावलेली रक्कम ही त्या सिनेमासाठी मिळालेल्या रकमेपेक्षा जास्त होती. काही पण म्हणा पण मानलं पाहिजे राव, म्हणजे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही असे आयुष्याचे सगळे टप्पे पार करत हा अवलिया कुठून कुठे पोहचला होता ते. पुढे ‘याला जीवन ऐसे नाव’ मधलं नाथा हे कॅरेक्टर, ‘वरचा मजला रिकामा’ मधलं दिगंबर, ‘एकच प्याला’ मधलं ‘तळीराम’ या सर्व भुमिका विशेष लक्षात राहिलेल्या भुमिका जरी असल्या तरी, ‘कवडीचुंबक’, ‘मेंढरं’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘या, घर आपलंच आहे’, ‘शिवसंभव’, ‘घरोघरी हीच बोंब’, ‘प्रेमसंन्यास’, ‘भाऊबंदकी’ ही आणि अशी तब्बल पन्नास नाटकं ही राजा गोसावींच्या नावावर आहेत. आता मराठी रंगभूमीवर त्यांनी सादर केलेल्या या नाटकांबद्दल गंम्मत सांगायची म्हणजे, नाटक सादर करताना त्यांना मध्येच पदरची वाक्य टाकायची सवय होती आणि तेही इतक्या सहजपणे बोलून जायचे, की लेखकसुद्धा गोंधळून जायचा, पण ही वाक्य म्हणताना त्यांचा हजरजबाबीपणा मात्र प्रेक्षकांची खास दाद मिळवायचा आणि हाचं होता त्यांचा खरा कॉन्फिडन्स. पण कुठलंही अभिनयाचं शिक्षण न घेतलेल्या या नटानं स्वतःला अभिनयामध्ये इतकं परफेक्ट बनवलं होतं कि नाटक आणि सिनेमा या दोन्ही मैदानामध्ये त्यांनी बाजी मारली. नाटकांसाठी ठरलेल्या तारखांना सांभाळत सिनेमांचं शूट या दोघांमध्ये ते आता पुरते बिझी झाले होते, पण विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टींना त्यांनी योग्य तो न्याय दिला. आता त्यांना दर्जेदार नाटकं आणि सिनेमे समोरून येऊ लागले होते. त्यांची नावं आता त्याकाळच्या मोठ्या गाजलेल्या नायिकांसाठी सुचवली जाऊ लागली होती.

(Raja Gosavi Biography| Vishaych Bhar)

रंजना, जयश्री गडकर यांसारख्या त्याकाळच्या प्रसिद्ध नायिकांना ‘नायक’ म्हणून आता राजा गोसावी हे नाव मिळालं होतं. मंडळी बोलता बोलता या विषयावरूनच वरून लक्षात आलं ते म्हणजे रंजना यांच्यासोबत ‘असला नवरा नको गं बाई’ या सिनेमातं चित्रित झालेलं ‘ही कश्यानं धुंदी आली’ हे प्रसिद्ध रोमॅन्टिक गाणं. आह्ह. ते गाणं आजही ऐकलं कि धुंद व्हायला भाग पाडतं. मंडळी त्यामध्ये पडद्यावर दिसणारे रोमॅंटिक गावरान राजा गोसावी सर्वांनाच भावले. त्यानंतर त्यांनी सिनेमांमधली एक एक शिखर चढायला सुरूवात केली होती. त्यांना बऱ्याच चांगल्या धाटणीच्या सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पैकी ‘अवघाचि संसार’, ‘कामापुरता मामा’, ‘बाप माझा ब्रह्मचारी’, ‘येथे शहाणे राहतात’, ‘वरदक्षिणा’, ‘वाट चुकलेले नवरे’, ‘सौभाग्य’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘आलिया भोगासी’, ‘गंगेत घोडे न्यायलं’, ‘चिमण्यांची शाळा’ यांसारख्या जवळपास शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आता त्यांची ऊठबस बड्या अभिनेत्यांसोबत व्हायला लागली होती आणि विशेष म्हणजे त्यातून ते अनुभव सुद्धा घेत होते, शिकत होते. असंच एकदा अशोककुमार यांच्यासोबत त्यांना काम करण्याचं भाग्य लाभलं, पण आता एवढ्या मोठ्या अभिनेत्यासोबत काम करायचं या गोष्टीचं आपल्या राजा गोसावीं यांना भयंकर टेन्शन आलं. पण मागे हटतील ते राजा गोसावी कसले? तेही तितक्याच ताकदीनं या सिनेमासाठी काम करायला तयार झाले. कितीही नाही म्हटलं तरी अशोककुमार यांनी राजा गोसावी यांच्या चेहऱ्यावरचे टेन्शनचे भाव हेरलेच. शूटिंगवेळी “आपल्यासमोर उभा असलेला कोणताही बडा अभिनेता, हा कस्पटाप्रमाणे समजून काम करत जा, त्यामुळे आपल्याला दडपण येत नाही”, हे दिग्गज अभिनेते अशोककुमार यांनी राजा गोसावींना दिलेल्या कानमंत्राला ऐकूनचं त्यांनी तो सिनेमा पूर्ण केला आणि त्यांनीही तो हा कानमंत्र पुढच्या वाटचालीसाठी कायम जपलासुद्धा. बरं ही झाली एखाद्या सकारात्मक भुमिका ताकदीनं पेलणाऱ्या राजाराम गोसांवींची एक बाजू, त्यांनी तर नायकासोबत खलनायक किंवा नकारात्मक भुमिकासुद्धा तितक्याच यशस्वीपणे पार पाडल्यात.

Raja Gosavi 
Rajana Deshmukh

(Raja Gosavi Biography| Vishaych Bhar)


कारण त्यांना मराठी भुमिका गाजवताना साधा भोळा-भाबडा युवक, प्रियकर, नवरा, जिवलग मित्र अशा भुमिकांमध्ये प्रेक्षकांना पाहण्याची सवय होती पण त्याचसोबत ‘संशयकल्लोळ’ आणि ‘सौजन्याची एैशी तैशी’ यामध्ये साकारललेल्या बनेल पुरुषाची भुमिका आणि नेगेटिव्ह रोल किंवा खलनायकाच्या भुमिका यांच्यामध्येही त्यांनी स्वतःला इतकं ढाळलं कि पडद्यावर सोज्वळ भुमिका गाजवणारा नक्की तो हाच अभिनेता का? असा सुद्धा प्रश्न पडावा, असं त्यांनी त्या सिनेमांत काम केलंय, पण याही त्यांच्या राजा गोसावींच्या व्हिलन लुकला लोकांनी भरपूर दाद दिली. वेगवेगळ्या भुमिकांसाठी राजा गोसावी आता बरेच मुरले होते, त्यांची मराठीमध्ये प्रसिद्धी खूप वाढली होती, याचाच फायदा घेत १९५८ मध्ये पुण्याच्या बाबुराव गोखलेंचा ‘राजा गोसावीची गोष्ट’ हा त्यांच्याच नावावर आधारलेला सिनेमा पडद्यावर झळकला, यामध्ये राजा गोसावींनी तिहेरी रोल केलाय. आता असा स्वतःचा ठसा उमटवलेल्या कसदार अभिनेत्याच्या अभिनयाची किर्ती हिंदी सिनेसृष्टीपर्यंत पोहचली नसती तर नवलचं होतं कारण त्यांच्या ‘भाभी’ आणि ‘स्कूलमास्टर’ या हिंदी सिनेमांमध्ये त्यांच्या मुरलेल्या अभिनयाचा दाखला पाहायला मिळतो. त्यांच या दोन्ही सिनेमांमधल्या हिंदी संवादावर असणारं प्रभुत्व आणि ती भाषा उच्चारताना स्वत:ला लावलेला लगाम यावरून हे राजाराम गोसावी नावाचं रसायन काय होतं, याची आपण कल्पना करू शकतो.  तर या अशा इरसाल नटानं आणि त्याच्या अभिनयानं १९५० ते १९८० या दरम्यान आपली मराठी रंगभूमी म्हणू नका, कि सिनेमे म्हणू नका, ज्या परिने जमेल, त्या परिने समृद्ध केले.

(Raja Gosavi Biography| Vishaych Bhar)

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

Sama Deshpande

‘रंगश्री’ या त्यांच्या नाट्यसंस्थेतून त्यांनी अनेक जुनी मराठी नाटकं सादर करत महाराष्ट्रभर दौरे केले. अभिनयक्षेत्रात त्यांनी दिलेल्या या योगदानाला कधीच कुठलं मराठी मन विसरू शकत नाही, हे नक्की. त्यांच्या अभिनयाच्या किर्तीचा किस्सा एकदा त्यांच्या लेकीने म्हणजेच अभिनेत्री शमा देशपांडेने यांनी सांगितला होता, त्या स्वतः जेव्हा बालाजी बॅनरखाली एका सिरिअलचं शूट करत होत्या, तेव्हा आपले जितूजी म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांनी राजा गोसावींच्या सिनेमाची आठवण सांगितली होती कि, जितूजींनी एकदा राजा गोसावींचा सिनेमा पाहण्यासाठी स्वतःची दहावीची पुस्तकं रद्दीवाल्याला विकली होती आणि त्या पैशांमधे ते राजा गोसावींचा सिनेमा पाहायला गेले होते, त्यावरून आपण अंदाज लावू शकतो कि शुन्यातून विश्व निर्माण केलेल्या या नटानं स्वतःला कसं सिद्ध केलं होतं ते. मंडळी रंगभूमीशी समरस होता होता नेमकं त्याचवेळी मरण कुशीत येण्याचं सौभाग्य फार कमी लोकांना मिळतं खरतर त्यासाठी राजा गोसावी हे नशीबवानचं म्हणावे लागतील, कारण 1998 मध्ये पुण्यात एका नाटकावेळी तयारी करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगातून कायमची एक्झिट घेतली. खरंतरं अगदी छोट्या- छोट्या भुमिकांसाठी धडपडणारा हा अभिनेता मराठीत अव्वल समजल्या जाणाऱ्या ‘नटसम्राट’ या महान कलाकृतीमध्ये ‘गणपतराव बेलवलकरां’ची भुमिका गाजवून कायम स्मरणात राहिला आणि ‘निष्ठेने काम करत राहा, जग त्याची दखल घेत ’, याचं सपशेल उदाहरण देऊन गेला. अशा या राजा गोसाविंचा जबरदस्त सिनेप्रवास तुम्हाला नेमका कसा वाटला त्ये आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

सातारचा ह्यो फाकड्या मराठी सिनेसृष्टीचा राजा गोसावी कसा झाला | Raja Gosavi Biography| Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *