शरद पवारांनी जे वसंतदादांसोबत केलं तेच आज अजितदादा त्यांच्यासोबत करतायत !

मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथींमुळे महाराष्ट्र देशाच्या केंद्रस्थानी आला आहे. अजित पवारांच्या बंडामुळे केवळ राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचीच पाळेमुळे उखडली गेली नाहीत तर काका Sharad Pawar यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलेल्या राजकीय नियोजनालाच सुरुंग लागला आहे. आता Ajit Pawar यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सगळीकडूनच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. अजित पवारांच्या या बंडाची शरद पवार यांना पूर्वकल्पना होती, असे आता काहीजण म्हणत आहेत. तर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खुणावत असल्याने अजित पवार यांनीच नियोजनबद्धपणे आखलेला हा राजकीय डाव आहे, असंही काही जणांचं म्हणणं आहे.

त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपामुळेसुद्धा नव्या राजकीय चर्चेला बळ मिळाले आहे. त्यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना या सर्व घटनाक्रमाला शरद पवार यांना जबाबदार ठरवत, “सत्तेत येण्यासाठी वाट्टेल ते करावं , अशी सुरुवात पहिल्यांदा शरद पवार यांनीच महाराष्ट्रात केली. आज त्याचेच चटके त्यांना सहन करावे लागत आहेत.” आता राज यांनी असा आरोप का केला.

हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ४० , ४५ वर्षे मागे जावे लागेल. तेव्हाच आपल्याला शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं का या त्यांच्यावर होणाऱ्या आरोपाचं उत्तर मिळेल.

Indira Gandhi
nasikrao tirpude
sharad pawar
शरद पवार 
sharad pawar old


तर मंडळी आणीबाणी उठल्यानंतर इंदिरा गांधी यांचे नेतृत्व स्वीकारण्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. परिणामी याच मतभेदातूनच १८ डिसेंबर १९७७ रोजी इंदिरा गांधी यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे त्यांनी ३ जानेवारी १९७८ ला इंदिरा काँग्रेची स्थापना केली. तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व ब्रह्मानंद रेड्डी व यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होते. या गटाला रेड्डी काँग्रेस म्हणून ओळखले जात होते. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे समर्थक असल्यामुळे त्यांच्यासह वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक हे नेतेदेखील रेड्डी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. तर नासिकराव तिरपुडे, रामराव आदिक ही मंडळी इंदिरा काँग्रेसमध्ये कार्यरत झाली. आणीबाणीनंतर केंद्रात इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि केंद्रात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले. पुढे १९७८ साली महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली अन् या निवडणुकीत जनता पक्षाला ९९, इंदिरा काँग्रेसला ६२; तर रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. कोणालाच स्पष्ट असे बहुमत मिळाले नाही. आणि मग इथूनच सुरु झाला सत्तेसाठीचा तो खेळ. यातूनच मग जनता पक्षाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस एकत्र आले. त्यातूनच वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिले आघाडी सरकार सत्तेत आले. त्यानंतर वसंतदादा पाटलांच्या नेतृत्वात सरकार अस्तित्वात आले. तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद गेले.

आता दोन्ही कॉंग्रेस एकत्र आले खरे मात्र त्या सरकारमध्ये सर्वकाही आलबेल होते असे नाही. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच त्यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेत सविस्तर सांगितलय. शरद पवार त्या पुस्तकात म्हणतात की ” नासिकराव तिरपुडे यांच्या मनात यशवंतराव चव्हाण यांच्यविषयी द्वेष होता. यशवंतरावांचं नेतृत्व झुगारून द्यायची जणू शपथ घेऊनच त्यांची वाटचाल सुरू होती. इंदिरा निष्ठावंता शिवाय दुसऱ्या कोणाचंही वर्चस्व सरकारमध्ये असू नये, अशी भूमिका तिरपुडे यांनी घेतली होती. वसंतदादा मुख्यमंत्री होते; पण मुख्यमंत्र्यांकडे जाणारी प्रत्येक फाईल माझ्याकडे आलीच पाहिजे, अशी भूमिका घेऊन तिरपुडे सरकारमध्ये कलहाचे बीज पेरत होते. तिरपुडेंच्या वागणुकीमुळे दादाही वैतागले होते आणि चव्हाणसाहेबही निराश झाले होते.

नासिकराव तिरपुडेंच्या भूमिकांमुळे या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला.असं त्यांचं म्हणणंय.
त्यातूनच मग पर्यायी सरकार देण्यासाठी शरद पवारांची जनता पक्षाशी चर्चा सुरू होती. जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी सरकारच्या स्थापनेसाठी पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे, सुंदरराव सोळंके अशा चौघांनी मंत्रीपदांचे राजीनामे देत पहिले पाऊल उचलले अन् शरद पवारांच्या बंडाला वेग आला. १९७८ सालच्या जुलै महिन्यात अधिवेशन सुरू असतानाच ३८ आमदारांना सोबत घेऊन शरद पवारांनी बंडखोरी केली आणि वसंतदादांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ही घटना पहिल्यांदाच घडली . शरद पवार त्यांच्या ३८ आमदारांसोबत विधिमंडळातच जनता पक्षासोबत संयुक्त बैठकीत सामील झाले. जनता पक्षाचे चंद्रशेखर, एस. एम. जोशी यांनी शरद पवारांकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आणि मग हेच सरकार पुढे पुलोद अर्थात पुरोगामी लोकशाही दल म्हणून प्रसिद्ध झाले.याच सरकारच्या स्थापनेवरून शरद पवार यांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा सुरु झालेल्या चर्चा आजही शरद पवार यांचा पिच्छा सोडताना दिसत नाहीत. सत्तेच्या या खेळात वरचढ ठरण्यासाठी आज ज्या काही अनैतिक तडजोडी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार यांच्याकडून केल्या जात आहेत.

sharad pawar
शरद पवार 
sharad pawar old

आजही अजित पवार यांनी आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांवर जोरदार निशाणा साधलेलाय‌. शरद पवार हे अजिबात विश्वासार्ह नेतृत्व नाही हा घणाघात त्यांनी पहिल्यांदाच On Record केलाय.

आता अजित दादांच्या या आरोपांची बीजं आपल्याला या ४० वर्षांपूर्वीच्या घटनेत सापडतात. आता त्यावेळी शरद पवार यांनी पुलोदचा हा प्रयोग करताना काँग्रेस, जनता पक्ष, समाजवादी, कम्युनिस्ट अशा वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या पक्षांना एकत्र आणले होते. तर आज भाजपने बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले आहे‌. ४० वर्षांपूर्वी बंड करुनच शरद पवार यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवले होते. आज त्यांचा पुतण्याही त्यांच्याशीच बंड करुन शरद पवारांच्याच जुन्या मार्गाचा अवलंब करत आहेत. आता काहीजण याला कर्म फिरून येतं असं आध्यात्मिक धार्मिक संकल्पनेतनं बघतायत. तर काहीजण मात्र याला अजितदादांची सत्तेसाठीची वैचारिक तडजोड म्हणतायत. त्यावेळीही शरद पवार यांच्यासोबत जवळजवळ ४० आमदार होते. तेवढीच संख्या आज अजित पवार यांच्यासोबत असल्याचा त्यांचा दावा आहे.

पण शरद पवारांनी केलेली पुलोद सरकारची स्थापना आणि ३८ आमदार घेऊन केलेली बंडखोरी याला यशवंतराव चव्हाण यांचा पाठिंबा होता का, असा प्रश्न आजही विचारला जातो . आणि योगायोग पहा अजित पवार यांच्या बंडालाही शरद पवार यांचा आशीर्वाद असल्याचीच चर्चा दबक्या आवाजात का होईना महाराष्ट्रात सुरू आहे. आता शरद पवार यांनी कायम सत्ताकारणाभोवतीचं‌ राजकारण केलं. म्हणजे काही झालं, कितीही संख्याबळ असलं तरी सत्तेत रहायचं अशीच शरद पवार यांची भूमिका राहिली आहे. त्यासाठी त्यानी कित्येकदा वैचारिक तडजोडी केल्या असाही त्यांच्यावर आरोप ठेवण्यात येतो. मग अगदी पुलोद प्रयोग असो ,भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा विषय असो कि मग कट्टर विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेवून महाविकास आघाडीची केलेली स्थापना ही उदाहरणं त्यासाठी पुरेशी बोलकी आहेत. पण ४० वर्षांपूर्वी इंदिरा कॉँग्रेस आणि रेड्डी कॉँग्रेसमध्ये संघर्षाचे कारण होते, तत्कालीन उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे पण यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये नेमकं कोण विष पेरत असेल ? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा किस्सा आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ खाली जाऊन पाहू शकता

38 आमदार पळवून जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले होते | Sharad Pawar Latest News | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/aplavishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *