वंचितला सोबत घेतलं नाही तर कांग्रेस राष्ट्रवादीचे हे ८ नेते पडतील | Prakash Ambedkar vs Sharad Pawar
पुढील वर्षी मे महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर काहीशी विस्कळीत झालेली महाविकास आघाडी आणि दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार गट यांना सोबत घेऊन लढणारा भाजपा, अशी लढत रंगणार आहे. पण या दोन्ही आघाड्यांमध्ये होणाऱ्या लढतीत एक तिसरा पक्ष निर्णायक भूमिका बजावणार आहे. तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपला मोठा जनाधार असल्याचे वेळोवेळी दाखवून दिले आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी आपलं उपद्रव मूल्य सिद्ध केलं आहे . वंचितच्या प्रभावामुळे गेल्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं गणित बिघडलं होतं. त्यामुळेच यावेळी भाजपाला रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मविआने सोबत घेतलं पाहिजे, असा सल्ला दिला जात आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारीवर नजर टाकल्यास असे आठ मतदारसंघ आहेत, जिथे वंचितला सोबत न घेतल्यास महाविकास आघाडीला यावेळी पराभवाचा सामना करावा लागू शकतो. त्या जागा कोणत्या आहेत , आणि वंचित कांग्रेस राष्ट्वादी आणि ठाकरे गटाच्या कुठल्या नेत्यांना त्यामुळे गॅसवर बसवू शकते. हेच आपण आजच्या या Blog मध्ये पाहणार आहोत .

(Prakash Ambedkar vs Sharad Pawar)
मंडळी, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी देशपातळीवर विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. ही इंडिया आघाडी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या रूपात भाजपाला आव्हान देत आहे. दरम्यान, ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश असलेली ही आघाडी आणखी बळकट करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याची चर्चा सुरू आहे. मात्र त्याला अद्याप अंतिम रूप आलेले नाही. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीमधील प्रवेश निश्चित असल्याच्या आशयाचे वृत्त कालपरवा आले होते. मात्र त्याबाबत अद्याप तरी अधिकृत अशी माहिती समोर आलेली नाही. तर आमचं ठाकरे गटासोबत ठरलंय. मात्र दोन भटजींचा अडथळा आहे, अशी खोचक प्रतिक्रिया देत प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. आता खरंतर इंडिया आघाडीची मुंबई मध्ये बैठक झाली तेव्हाच वंचितला सोबत घेतलं जाईल. असं म्हणलं गेलं होतं. पण तसं झालं नाही. आता खरंतर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं तर आंबेडकरांचे वंशज सोबत असल्याचं नरेटिव्ह इंडिया आघाडीला सेट करता आलं येईल .असो. तर आता यामुळेच राज्यात ४८ च्या ४८ जागा लढवणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हणलंय . आज सातार्यात यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शनदेखील केलंय. पण आता राज्यातील एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहिल्यास वंचितला सोबत न घेतल्यास आपल्याला मोठा फटका बसू शकतो, याची जाणीव मविआलाही आहे. मात्र जागावाटपातील तिढ्यामुळे वंचितचा महाविकास आघाडीतील प्रवेश अडला आहे. मात्र वंचितला सोबत न घेणे महाविकास आघाडीसाठी तितकेसे पडवडणारे नाही. कारण अनेक मतदारसंघात मविआचे गणित बिघडवण्याती ताकद वंचितकडे आहे. पण वंचित महाविकास आघाडीला जड जाऊ शकतं ते मतदारसंघ कोणते आहेत ते जरा बघूयात.
(Prakash Ambedkar vs Sharad Pawar)
या यादीमधील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला २०१४ च्या मोदीलाटेत भाजपानं भगदाड पाडलं होतं. २०१९ मध्येही येथून भाजपाचे संजयकाका पाटील १ लाख ६४ हजार मतांनी विजयी झाले होते. मात्र २०१९ मध्ये इथून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपिचंद पडळकर यांनी घेतलेली ३ लाखांहून अधिक मतं चर्चेचा विषय ठरली होती. या मतांमुळेच महाविकासआघाडीमधील स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार विशाल पाटील यांना पराभूत व्हावे लागले होते. जर वंचितच्या उमेदवाराने एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतं घेतलं नसती तर येथील निवडणूक भाजपच्या संजयकाकांना चांगलीच जड गेली असती. मात्र आता चार वर्षांत परिस्थिती बदललीय. गोपिचंद पडळकर पुन्हा भाजपमध्ये आले आहेत. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येही फुटाफूट झाली आहे. अशा परिस्थितीत वंचितचा उमेदवार समोर असल्यास महाविकास आघाडीसाठी येथील आव्हान अधिकच कठीण होऊ शकते. इथून भाजपचे दोन आमदार, शिंदे गटाचा एक , कांग्रेसचे दोन , राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आमदार आहे.आता इथून दोन्ही बाजूत कांटे की टक्कर आहे. पण म्हणून तर अशात वंचितची मतं आपल्याकडं वळवली नाहीत तर मग महाविकास आघाडीचा कार्यक्रम इथं गंडू शकतो.

(Prakash Ambedkar vs Sharad Pawar)
वंचितमुळे महाविकास आघाडीचं गणित बिघडण्याची शक्यता असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे सोलापूर.
सोलापूरमध्ये २०१९ च्या निवडणुकीत येथे भाजपाच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा १ लाख ५८ हजार मतांनी पराभव केला होता. इथेही वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिंदेंचं गणित बिघडवलं होतं. प्रकाश आंबेडकर यांनी १ लाख ७० हजार मतं मिळवली होती. इथून वंचित प्लस कांग्रेस हा आकडा भाजपा उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्यापेक्षा १२ हजारांनी अधिक होता. जर इथे वंचितचा उमेदवार नसता तर कदाचित सुशीलकुमार शिंदेंना विजयाची संधी मिळाली असती. सध्या या मतदारसंघात भाजपाचे ४ आमदार आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार आहे. त्यामुळे इथेही भाजपाचं आव्हान परतवून लावायचं असल्यास महाविकास आघाडीसाठी वंचितची साथ महत्त्वाची ठरणार आहे.
(Prakash Ambedkar vs Sharad Pawar)
या यादीमधील तिसरा मतदारसंघ आहे तो हातकणंगले.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघामध्ये धैर्यशील माने हे विद्यमान खासदार आहेत. ते सध्या शिंदे गटात असल्याने त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र य़ा मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीची मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे. २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अस्लम सय्यद यांनी तब्बल १ लाख २३ हजार मतं मिळवली होती. इथे वंचितच्या उमेदवाराने घडवलेल्या मतविभाजनामुळे महाआघाडीचे उमेदवार असलेल्या राजू शेट्टी यांना पराभव पत्करावा लागला होता. राजू शेट्टी यांना ४ लाख ८९ हजार तर विजयी उमेदवार धैर्यशील माने यांना ५ लाख ८५ हजार मतं मिळाली होती. त्या दोघांमधील अंतर ९६ हजार मतांचं होतं. जर इथे वंचितचा उमेदवार नसता तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं. त्यामुळे या लोकसभा निव़डणुकीतही इथे वंचितने उमेदवार दिल्यास महाविकास आघाडीचा खेळ बिघडू शकतो.

(Prakash Ambedkar vs Sharad Pawar)
चौथा मतदारसंघ आहे, नांदेड.
तर बघा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात धक्कादायक निकाल लागला होता तो नांदेडमध्ये. येथे काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपाचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांनी ४० हजार मतांनी पराभव केला होता. पण या मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या पराभवाची पटकथा लिहिली ती वंचित बहुजन आघाडीने. नांदेडमध्ये वंचितचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनी तब्बल १ लाख ६६ हजार मतं मिळवली होती. हीच मतं अशोक चव्हाण यांच्या पराभवाचं कारण ठरली होती. येथील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी काँग्रेसचे, दोन ठिकाणी भाजपाचे आणि एका मतदारसंघात शिंदे गटाचा आमदार आहे. त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीने बलाबल समसमान असलं तरी वंचितचा उमेदवार रिंगणात उतरल्यास २०२४ मध्येही मतविभागणी होऊन हा मतदारसंघ काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीसाठी जड जाण्याची शक्यता आहे.
(Prakash Ambedkar vs Sharad Pawar)
पाचवा मतदारसंघ आहे अमरावती.
२०१९ मध्ये येथे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा ३६ हजार मतांनी पराभव केला होता. या मतदारसंघात वंचितचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनी ६५ हजार मतं मिळवली होती. येथील तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. तर दोन ठिकाणी बच्चू कडू यांच्यासह प्रहार पक्षाचे दोन आणि अपक्ष रवी राणा असे सहा आमदार आहेत. यावेळी इथे नवनीत राणा ह्या भाजपाकडून लढण्याची शक्यता आहेत. तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. मात्र वंचितने तगडा उमेदवार दिल्यास इथलंही गणित बदलू शकतं.

(Prakash Ambedkar vs Sharad Pawar)
सहावा मतदारसंघ आहे बुलढाणा.
बुलढाण्यामध्ये सध्या शिंदे गटात असलेले प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. या मतदारसंघातून प्रतापराव जाधव हे या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. प्रतापराव जाधव यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा १ लाख ३३ हजार मतांनी पराभव केला होता. मात्र इथेही वंचितच्या उमेदवारानं केलेलं मतविभाजन निर्णायक ठरलं होतं. येथील वंचितचे उमेदवार बळीराम शिरसकर यांनी तब्बल १ लाख ७२ हजार मतं मिळवली होती. जर इथे वंचितच्या उमेदवाराने मतविभाजन घडवून आणलं नसतं तर प्रतापराव जाधव यांना २०१९ ची निवडणूक जड गेली असती. मात्र शिरसरकर यांनी तब्बल १५ टक्के मतं खेचल्याने प्रतापराव जाधव यांचा विजय सोपा झाला होता. इथल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन ठिकाणी भाजपा तर दोन ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत. तर एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे इथेही महायुतीचं पारडं काहीसं जड आहे. आता प्रतापराव जाधव हे विजयी चौकार ठोकण्याच्या इराद्याने लोकसभेच्या मैदानात उतरतील अशी शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि वंचित हे एकत्र आल्यास ते महायुतीला टक्कर देऊ शकतात. अन्यथा दोघांमध्ये मतविभाजन होऊन फायदा पुन्हा एकदा हा महायुतीच्याच उमेदवाराला होऊ शकतो.
(Prakash Ambedkar vs Sharad Pawar)
सातवा मतदारसंघ आहे, चंद्रपूर –
वंचितसोबत आघाडी न झाल्यास महाविकास आघाडीला जड जाणारा मतदारसंघ म्हणजे चंद्रपूर. येथील खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे हा मतदारसंघ सध्या रिक्त आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते हंसराज अहिर यांनी २००४, २००९ आणि २०१४ अशी सलग तीन वेळा येथून बाजी मारली होती. मात्र २०१९ मध्ये मोदी लाटेतही अहीर यांना बाळू धानोरकर यांच्याकडून जवळपास ४५ हजार मतांनी पराभूत व्हावे लागले होते. या मतदारसंघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचितचे उमेदवार अड. राजेंद्र महाडोळेंनी १ लाख १२ हजार मतं मिळवून अहिर यांचं गणित बिघडवलं होतं. मात्र सद्यस्थितीत या लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. तसेच एका अपक्ष आमदाराचा भाजपाला पाठिंबा आहे. तर काँग्रेसकडे दोन आमदार आहेत. तर बाळू धानोरकर यांचं अकाली निधन झाल्याने महाविकास आघाडीकडे तगडा चेहराही नाही. अशा परिस्थितीत येथे वंचितची साथ महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

(Prakash Ambedkar vs Sharad Pawar)
आठव्या क्रमांकावर आहे, विदर्भातील गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ.
या मतदारसंघात भाजपाचे अशोक नेते गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी झाले आहेत.
मात्र २०१४ मध्ये तब्बल ५२ टक्के मते मिळवणाऱ्या नेते यांना २०१९ ची निवडणूक त्या तुलनेत सहज गेली होती. कारण त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसच्या नामदेव उसेंडी यांचा ७७ हजार मतांनी पराभव केला खरा पण वंचितचे उमेदवार रमेश गजबे यांनी त्या निवडणुकीत एक लाखांहून अधिक मतं मिळवली होती. हीच मतं अशोक नेते यांच्या विजयात निर्णायक ठरली होती. कारण काँग्रेस आणि वंचितच्या उमेदवारांच्या मतांची बेरीज ही अशोक नेते यांच्या मताधिक्यापेक्षा अधिक होती. पण आता कांग्रेस आणि वंचित दोन्ही पक्ष एकत्र लढले असते तर तिथं भाजपा उमेदवाराचा विजय झाला नसता. यावेळीही येथील चित्र फारसे बदललेले नाही. त्यामुळे जर वंचितने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर ते महाविकास आघाडीसाठी अडचणीचे ठरू शकते. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या बर्याच मतदारसंघात वंचितनं २०१९ ला क्लोज फाईट दिली होती. जसं की अकोला लोकसभा मतदारसंघात वंचितचे प्रकाश आंबेडकर हे कांग्रेसच्या हिदायतुल्लाह पटेल यांना मागे सारत दोन नंबरला राहिले होते. पण तिथे भाजपचे संजय धोत्रे हे निवडून आले होते. आता वंचितने राज्यात एकही जागा जिंकली नसली तरी त्यांच्या मुळे किमान कांग्रेस राष्ट्वादीच्या 8 जागा पडल्या. तर पाच दहा ठिकाणी वंचितनं impactful मतं मिळवली.
(Prakash Ambedkar vs Sharad Pawar)
हे पण विषय भारी वाच भाऊ
तासगाव कवठेमहाकाळचा पुढचा आमदार कोण | Rohit Patil की Prabhakar Patil | Vishaych Bhari
धाराशिवचा पुढचा खासदार कोण | Omraje Nimbalkar की Rana Jagjit Sinha Patil | Vishaych Bhari
रावेरचा पुढचा खासदार कोण | Eknath Khadse की Raksha Khadse | Latest Marathi News | Vishaych Bhari
परिणामी ,सध्या तरी महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडताहेत. त्यात महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र येण्याची केवळ चर्चा सुरू आहे. कदाचित पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याबाबतचं चित्र स्पष्ट होईल. पण राजकारणात एक आणि एक कधीच दोन होत नाहीत. कधी कधी एक आणि एक अकरा होतात. तर कधी एक आणि एक मिळून एकच राहतो. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र आल्यास कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल. कदाचित फार मोठा फरक पडणारही नाही. कारण जो काही निकाल द्यायचा असेल तो सध्या मतदारांच्या मनात आहे. तोपर्यंत राजकीय गोळाबेरीज होत राहील. आपण त्यावर लक्ष ठेवूच. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मात्र आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/vishaychbhari
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply