40000 कोटींचा Share Market Scam करणारा Ketan Parekh सध्या काय करतो | Vishaych Bhari

नव्वदच्या दशकात हर्षद मेहता नावाच्या माणसानं 5000 रुपये घेऊन मुंबई जवळ केली अन नंतर त्याचं मुंबईतल्या दलाल स्ट्रीटवर वसलेल्या शेअर मार्केटचा तो किंग झाला. तो म्हणेल ती मार्केटची पूर्व दिशा असायची. तो कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कंट्रोल करायचा. कधी भाव पाडून ठेवायचा तर कधी टायमिंग साधून अस्मानाला भिडवून ठेवायचा. त्यातून त्यानं गच्चम प्रॉपर्टी जमवली होती पण 1992 साली त्यानं Sbi मध्ये केलेला पैशांचा फ्रॉड समोर आला अन त्याचंसोबत देशातला तोवरचा सगळ्यात मोठा स्कॅम उघडकीस आला. जवळपास 5 हजार कोटींचा तो शेअर मार्केट स्कॅम होता ज्याची किंमत आजच्या घडीला 40 हजार कोटींच्या घरातय. त्याचं हर्षद मेहताचा चेला केतन पारेख. ज्यानं 2001 साली तब्बल 40 हजार कोटींचा स्कॅम केला अन आख्खं शेअर मार्केट मुळापासून हादरवून ठेवलं. पण केतन पारेख याच्या स्कॅमचा इम्पॅक्ट मार्केट आणि लोकांच्या आयुष्यावर जास्त झाला कारण त्यानं सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाना गंडा घातला. आजच्या या Blog मध्ये आपण केतन पारेखनं 2001 सालचा तो आर्थिक घोटाळा कसा केला त्याची ए टू झेड कहाणी जाणून घेणारे,

Ketan Parekh

(Share Market Scam | Ketan Parekh )

सुरुवातीला आपण केतन पारेखचा उदय कसा झाला ते पाहू. केतन पारेख यांचा जन्म 1963 साली मुंबईतल्या चिमणलाल आणि जशवंती पारेख यांच्या घरी झाला. मुबंईतचं तो वाढला. त्याचं कुटुंब उच्च मध्यमवर्गीय बॅकग्राऊंडच होतं आणि त्याचे वडील चार्टर्ड अकाउंटंट व स्टॉक ब्रोकर होते. त्यांचा एन एच सिक्युरिटीज नावाचा व्यवसाय होता. कळत्या वयाचं झाल्यापासून केतननं वडिलांकडून हळूहळू शेअर मार्केट शिकून घ्यायला सुरुवात केली. पुढं जाऊन त्यानं उच्च शिक्षण घेऊन त्याचं चार्टर्ड सीए व्हायचं स्वप्न पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करून तो कुटुंबाच्या ब्रोकिंग व्यवसायात सामील झाला. पुढं जाऊन केतन पारेखला हर्षद मेहताच्या ग्रोमोअर कंपनीत काम करण्याची संधी चालून आली. त्याकाळात केतन पारेख यानं हर्षद मेहताकडून शेअर ट्रेडिंग शिकून घेतलं. त्याकाळात मोठमोठ्या कंपन्यांच्या मालकांशी केतनचा संबंध यायचा. त्यांच्याशी भेटीगाठी व्हायच्या. हर्षद मेहतानं त्याकाळी वापरलेली “ पंप आणि डंप ” ही प्रणाली केतन पारेखनं पुरेपूर समजून घेतली. पण पुढं त्यात बदल करून त्याचा प्रभावी वापर केला. आता ही पंप अँड डंप काय भानगडय तर ऐका, जेव्हा एखादा मोठा गुंतवणूकदार प्रथम शेअर्सची किंमत वाढवतो आणि नंतर स्टॉकचा भाव गगनाला भिडल्यानंतर सर्व शेअर्स विकून बाहेर पडतो त्या प्रक्रियेला पंप अँड डंप असं म्हणतात. हर्षद मेहता त्याचा वापर करून फार कमी काळात शेअर मार्केटचा किंगमेकर ठरला होता. अन त्याच्याचं पाऊलावर पाऊल ठेवून केतन पारेख सुद्धा त्याची वाटचाल करत होता. त्यानं काय केलं तर लोकांना स्वस्त शेअर्सची स्वप्ने दाखवली. म्हणजे २००० च्या सुरुवातीला केतनला असं वाटायचं की आपल्या देशातलं आयटी क्षेत्र वेगाने वाढेल. म्हणून त्यानं आयटी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मात्र, बाजारातील संधीचा फायदा घेण्यासाठी त्यानं छोट्या कंपन्या निवडल्या आणि ‘पंप अँड डंप’च्या माध्यमातून जबरदस्त कमाई ही केली. त्यानंतर केतन कमी बाजार भांडवल आणि कमी रिस्क असलेले शेअर्स शोधत राहिला. त्यानंतर तशा शेअर्समध्ये पैसा लावून त्यानं त्याच्या नेटवर्कद्वारे कंपन्यांमध्ये इनसाइड ट्रेडिंग करायचा सुरूवात केली. जे की शेअर मार्केटमध्ये इलीगल समजलं जातं. पण तोवर केतन पारेखची गाडी भुंगाट सुटली होती. तो तेवढ्यावर थांबला नाही. त्यानं निवडलेल्या १० शेअर्सच्या मार्केटिंगसाठी एक खतरनाक शक्कल लढवली.

(Share Market Scam | Ketan Parekh )

लोकांना त्याचे स्टॉक आयडेंटीफाय करता यावेत म्हणून त्यानं निवडलेल्या शेअर्सला K-10 स्टॉक्स असं नाव द्यायला सुरुवात केली. लोकं त्या K-10 शेअर्सच्या वाटचालीबद्दल नेहमी उत्सुक असायचे, पण त्यामागची गेम वेगळी होती. केतन पारेख महाकलंदर माणूस होता. असं म्हणतात केतन पारेखनं त्याच्या चढत्या कारकिर्दीत पेन्टाफूल सॉफ्टवेअरच्या शेअर्सची किंमत १७५ पासून २,७०० पर्यन्त नेली होती. ग्लोबल टेलिसिस्टीमचा शेअर्स ८५ रुपयापासून ३१०० रुपये तर एचएफसीएलचा शेअर्स ४२ रुपयांपासून २३०० रुपयांपर्यन्त तर झी चा साडेसातशेचा शेअर्स अकरा हजारांवर नेला होता. आहे कनाय रावस माणूस. मंडळी हर्षद मेहता रिटेल इन्व्हेस्टरवर त्याचं जाळं फेकायचा तर केतन पारेख हा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरवर त्याचे सगळे डाव खेळायचा. आता रिटेल आणि इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरवर मध्ये फरक काय तर ऐका कोणताही व्यक्ती व्यक्तिगतरित्या शेअर मार्केटमध्ये शेअर्स विकत घेतो तेव्हा त्याला रिटेल इन्व्हेस्टर म्हणतात तर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे शासनाच्या UTI, म्युचुअल फंडच्या कंपन्या मोठ्या प्रमाणात संस्थेसाठी म्हणून शेअर्स खरेदी करतात त्याला इन्स्टिट्यूशनल शेअर्स इन्व्हेस्टर असं म्हणतात.

Ketan Parekh

(Share Market Scam | Ketan Parekh )


केतन पारेख इतरांच्या मार्फत युटीआय अर्थात युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया सारख्या संस्थामार्फत इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंगमध्ये शेअर्स विकत घ्यायचा. त्यासाठी तो स्वतःच्या खिशातला पैसा वापरायचा नाही तर तो मोठ्या संस्थांना कुठे पैसे लावायचे यासाठी मदत करायचा अन त्याचंबरोबर स्वतःचं साधवून घ्यायचा. हो बरोबर ओळखलंत. त्याच पम्प आणि डम्प सिस्टिमचा वापर करून. म्हणजे नेमकं तो काय करायचा तर UTI साठी 1000 हजार कोटींचे शेअर्स विकत घेऊन त्यात स्वत:च्या कंपनीमार्फत पण काही शेअर्स घेवून ठेवायचा. पुढं शेअर्सची मागणी वाढली आहे अस दाखवून शेअर्स प्रमोट करणं बंद करायचा आणि मार्केट कोसळायचं. त्यात UTI आणि इतर संस्थाचं बेक्कार नुकसान व्हायचं पण केतन पाऱेखची मात्र चांदी व्हायची. 1997 ते 2001 याकाळात त्यानं टेलिकॉम क्षेत्रातल्या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात निवडले. त्या शेअर्सचं मार्केटिंग करून त्यानं लोकांना विश्वासात घेऊन ते शेअर्स विकत घ्यायला भाग पाडलं. काही जणांच्या म्हणण्यानुसार केतन पारेख तेव्हा २० हून अधिक ट्रेडिंग कंपन्याचा मालक होता. त्या कंपन्यांमधून तो सर्क्युलर ट्रेडिंग करायचा. म्हणजे एका कंपनीतून शेअर्स विकत घ्यायचा तर दूसऱ्या कपंनीतून विकायचा. लोकांना शेअर्सचा व्यवहार पूर्ण झालाय असं दाखवायचा. त्यासाठी मीडियातल्या लोकांची मदत घ्यायचा. गुंतवणूकदारांना वाटायचं शेअर्सची उलाढाल होतेय अन मग शेअर्सची मागणी वाढायची.

(Share Market Scam | Ketan Parekh )

मागणी वाढली की शेअर्सची किंमत वाढवायची या खेळात केतन हुशार झाला होता. अशा प्रकारे शेअर्सच्या किंमती फुगवून तो बेक्कार पैसे छापायचा. पण प्रश्न असाय, सुरुवातीला त्येनं एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कशी उभी केली. तर माध्यमात आलेल्या बातमीनुसार तो पे ऑर्डरचा वापर करुन पैसे मिळवायचा. पे ऑर्डर म्हणजे काय तर समजा तुम्ही ५० कोटींचे शेअर्स बॅंकेकडे ठेवले तर बॅंक तुम्हाला दहा कोटीपर्यन्त कर्ज उपलब्ध करून देते. म्हणजे दहा कोटींची पे ऑर्डर काढली जाते. त्यासाठी त्यानं दोन बॅंकांना गळाला लावलेलं होतं. त्यांची नावं अशी, ग्लोबल ट्रस्ट बॅंक आणि माधवपूरा मर्केंन्टाईन को-ऑपरेटिव्ह बॅंक. माधवपूरा बॅंकेची ही पे ऑर्डर मुंबईच्या शेअर मार्केटमधल्या बॅंक ऑफ इंडियामध्ये दिली की ते केतनला पे ऑर्डरची रक्कम द्यायचे. त्या रक्कमेचा बॅंका आपापल्यात क्लिअरन्स करून घ्यायच्या. असं केलं की पैशाचा नेमका सोर्स कळत नाही. पण इथं RBI चा एक नियम होता, तो असा की कुणालाचं शेअर्सवर १५ कोटींहून अधिक कर्ज दिलं जाणार नाही पण केतन पारेखनं बॅंकेच्या अधिकाऱ्यांची मर्जी राखून तब्बल ५०० कोटींपेक्षा जास्त कर्ज काढलं होतं. कुणाला त्याची कानोकान खबर नव्हती. केतन पारेखसाठी सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण 2001 साली गेम फिरली अन पारेखचं साम्राज्य उध्वस्त झालं. त्याचं झालं असं की केतननं फुगवलेल्या शेअर्सची किंमत अचानक कमी होऊ लागली. पण तरीही सुरुवातीला केतन पारेख डगमगला नाय. कारण गड्यानं पुन्हा एकदा माधवपूरा बॅंकेतून 137 कोटींची पे आर्डर उचलली. नेहमीप्रमाणं ती बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत दिली अन तिथून पैसे त्याच्या इतर कंपन्याकडं वळते केले. पण नंतर जेव्हा दोन बॅंकाच्या क्लिअरन्सची वेळ आली तेव्हा माधवपूरा बॅंकेने आम्हाला जमणार नाही म्हणून सांगितलं. दरम्यान इकडं बॅंक ऑफ इंडिया केतनला पैसे देवून बसली होती. त्यांनी मग केतनला 137 कोटी परत करा म्हणून सूचना केली. पण तोवर केतन पारेख पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवून मोकळा झाला होता.

Ketan Parekh

(Share Market Scam | Ketan Parekh )

तरीही कसं बसं करून केतननं 7 कोटी रुपये बॅंक ऑफ इंडियाला दिले. पण बँकेचं त्यावर समाधान झालं नाही. झालं, बॅंकेनं केतनवर 130 कोटींना फसवल्याची तक्रार दाखल केली अन केतन पारेखचा तो प्रसिद्ध घोटाळा बाहेर आला. बघता बघता तो स्कॅम देशभरात चर्चेचा विषय झाला. मीडियानं बातम्या लावून धरल्या. त्याचा परिणाम असा झाला की शेअर मार्केट पुन्हा धंद्याला लागलं. पाच दहा हजारांवर गेलेल्या शेअर्सच्या किमती पुन्हा फिरून पन्नास रुपयांवर आल्या. हा 1992 सालच्या हर्षद मेहता स्कॅमचा पार्ट 2 होता. आरबीआयनं पारेख विरोधात तपास सुरू केला तेव्हा पारेख इनसाइड ट्रेडिंगमध्ये दोषी आढळला आणि त्यानंतर सीबीआयनं केतनला अटक केली. पुढं शेअरच्या किमतीत फेरफार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं आणि चौकशीनंतर सेबीनं त्याला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्यास बंदी घातली. त्याचवेळी न्यायालयानं पारेखला दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार केतन पारेखनं शेअर मार्केटमध्ये पंप अँड डंप पद्धतींद्वारे सुमारे ४० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. तर एकूण अशी आहे केतन पारेख स्कॅमची संपूर्ण कहाणी. आपण आपल्या कष्टाची कमाई बँकेत ठेवतो सेफ राहील, अडीअडचणीला कामाला येईन म्हणून.

(Share Market Scam | Ketan Parekh )

हे विषयच भारी वाचलेस का भावा !

Ketan Parekh
Nirav Modi 
Harsad Mehata 
Vijay Mllya


पण हर्षद मेहता, केतन पारेख, विजय माल्ल्या, नीरव मोदी सारखे कोणीतरी महाठग येतात अन बँकासकट आपल्या पैशाला पण कात्री लावून जातात. दुःख फक्त एवढंचय ह्ये बहाद्दर भले मोठे स्कॅम करून सुद्धा परदेशी जाऊन सुखात राहतात पण सामान्य माणसानं, शेतकऱ्यानं एक कर्जाचा हफ्ता चुकवला तर बँकेचे कर्मचारी त्याला नीट जगू देत नायत. असो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्ये मात्र आम्हाला कमेंट करून नक्की सांग

40000 कोटींचा Share Market Scam करणारा Ketan Parekh सध्या काय करतो | Vishaych Bhari

Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇

https://www.facebook.com/vishaychbhari

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *