या ५ गोष्टी करा मग एकरी 100 टन ऊस नाय निघाला तर बोला | ऊस लागवड | Sugarcane Farming
मंडळी ऊस हे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच प्रमुख नगदी पीक मानलं जातं आणि सध्या उसतोडणीचा सीजन सुरूय.. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास 80 टक्के शेतकऱ्यांची आर्थिक गणितं ही या ऊसावरच अवलंबून असतात.. आता एकरकमी मोठी रक्कम येते म्हणून शेतकरी ऊसाला प्राधान्य देतो. जास्तीत जास्त टनेज आपल्या रानात कसं निघाल़ं याकडे त्यो लक्ष देतो. पण मंडळी काही शेतकर्यांचा अपवाद वगळता बर्याच शेतकर्यांचा ऊस टनेज मध्ये मार खातो. पण काय गोष्टी पाळल्या म्हंजी एका एकरात 100 टनाचं उत्पादन घेता येतंय? नाय म्हंजी एकरी शंभर टन घेता येणं शक्य आहे का? आणि असेल तर एकरी शंभर टन उत्पादन काढायचा नेमका formula काये ? थांबा जरा डिटेल मध्ये सांगतो. तर मंडळी एकरात शंभर टन ऊस काढणं शंभर टक्के शक्यंय. अहो तशी बरीच उदाहरणं बी तुम्ही तुमच्या अवतीभवती किंवा पेपराबिपरात वाचली असत्याल. अगदी शंभर टनंच नाय तर काही शेतकऱ्यांनी तर इन्वर्टेड स्प्रिंकलर्स किंवा फॉगर्स चा वापर करून चक्क 150 टनापेक्षाही जास्त उत्पादन आपल्या रानात काढलंय. तवा आज त्या यशस्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा formula मी तुम्हाला उलगडून सांगणारेय.
तर बघा पहिला मुद्दाय जमीनीची निवड आणि मशागतीचा.
म्हणजे बघा उसासाठी कोणत्याही प्रकाराची जमीन चालते फक्त ती निचऱ्याची हवीय मशागतीचं म्हणाल तर पहिल्यांदा निवड केलेल्या जमिनीत उभी आडवी नांगरट करून घ्यावी. सेंद्रिय कर्बासाठी शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट किंवा हिरवळीच्या खताचा वापर करावा. आता बघा मंडळी आपल्याला उत्पादन तर हवं असत पण आपण सेंद्रिय कर्ब म्हणजेच Organic Carbon या घटकाकडे अजिबातच लक्ष देत नाहीं आन तिथंच आपला घोळ होतो. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे सेंद्रिय कर्ब काय करतं तर ऐका, सेंद्रिय कर्ब पिकाला सेंद्रिय स्वरूपात अन्नद्रव्य उपलब्ध करून देतं. त्याचबरोबर पिकाच्या मुळाच्या अवतीभोवती हवा खेळती राहावी म्हणून पोअर्स म्हणजेच छिद्र निर्माण करतं. जमिनीतील जीवानूंची संख्या वाढवतं. त्यामुळं शेतकऱ्यानो, एकरी शंभर टनच टार्गेट गाठायचं असेल तर सेंद्रिय कर्बाचं व्यवस्थापन करण लय म्हंजी लय महत्वाचं हाय बघा.
आता नंबर दोनय, उसासाठी सरी किती फुटाची असावी,ह्यो विषय.
तर बघा जर तुमची जमीन मध्यम आणि हलक्या स्वरूपाची असेल तर साडेचार फुटी सरी घालावी आणि चांगली जमीन असेल तर 5 फूट, 6 फूट इतकी सरी तुम्ही घालू शकता. पण सरी घालण्यापूर्वी शेतामध्ये रोटरची मशागत करण आवश्यकय बरं का !
आता तिसरा मुद्दाय लागणीचा.
म्हणजे बघा उसाच्या लागणीसाठी तुम्ही 86032, 265, 10001 यापैकी कोणतंही वाण घेऊ शकता ह्यो समदा तुमचा चाॅईसंय.. तुम्हाला उत्तम रिझल्ट हवा असेल तर रोपांची लागवड करावी.. नाहीतर एक डोळा पद्धतीने आडसाली आणि दोन डोळा पद्धतीने पूर्व हंगामी लागण करून घ्यावी. पण लागणीच्या वेळी युरिया, DAP, SSP, मॅग्नेशियम, सल्फेट, micronutrient अशा खतांचा बेसलं डोस नक्की दिला पाहिजे.. रोपे लावत असाल तर मग अगोदर जमीन भिजवून घ्यावी आणि मगं नंतर रोपे जमिनीत व्यवस्थित दाबून घ्यावीत .. रोपाना टप्प्या टप्प्यानं खतांच्या काही ग्रेड जस कि 19 19 19, 12 61, 14 48, ह्यूमिक ऍसिड, कीटकनाशक, बुरशीनाशक, काही बायोस्टीम्युलन्ट, अमिनो ऍसिड बेस टॉनिक, जिवाणू यांच्या आळवण्या द्याव्यात.. हा,सुरवातीच्या काळात स्फूरदयुक्त खताचं प्रमाण जास्त ठेवायचं ज्यामुळं मुळांची वाढ जोरदार हुतीय. त्याचबरोबर द्राक्ष शेतकरी त्यांच्या द्राक्ष्यांसाठी जी संजीवक म्हणजेच plant growth regulators वापरतात ती संजीवक फवारणी साठी वापरावीत. 4, 5 फवारण्या टप्या टप्यानं 10 ते 15 दिवसाच्या फरकाने कराव्यात.
आता चौथा मुद्दाय भरणीचा.
तर बघा मंडळी उसासाठी फुटवे नियंत्रणासाठी भरणी अत्यंत महत्वाची असते. एक एकर उसात साधारण तुटणाऱ्या उसाचे 40,000 च्या आसपास फुटवे असावेत. त्याच्यापेक्षा जास्तही नसावेत आणि कमीही नसावेत. हे फुटवे निघण्यासाठी आणि ते नियंत्रित करण्यासाठी बाळ भरणी अत्यंत महत्वाची आहे.. म्हणून मंडळी 60 व्या किंवा 70 व्या दिवशी उसाला बाळ भरणी एकशेएक टक्का द्यावी. त्यासाठी युरिया, DAP, ssp, 24:24 यांनसारखी खतबी शंभर टक्के द्यावीत. त्याअगोदर रोपे एक ते सव्वा महिन्याची झाल्यावर रोपांच्या भवती खते टाकून 2 इंच माती ओढून घ्यावी आणि मदर शूट म्हणजेच जेठा कोंब काढून टाकावा. जेणेकरून रोपाला पुरेसे हेल्दी फुटवे येतील. 90 ते 120 या दिवसादरम्यानच उसाला मुख्य भरणी करावी. ज्यामध्ये सर्व अन्नद्रव्य समावेशक असा डोस उसाला द्यावा. पॉवर टिलरने भरणी केली तर मग विषयच भारीये. आता रोपं लावणीनंतर आणि मुख्य भरणीवेळेस जिवाणूची आळवणी करावी..मुख्य भरणीनंतर उसाला ड्रीपमधूनं अमोनियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, युरिया, पोटॅश या खतांचा डोस दर पंधरा दिवसाला शंभर टक्के द्यावा,तीथं अजिबात हयगय होता कामा नये. त्याचबरोबर 2 ते 3 टप्प्यात ऊसाची पाचट सोलून घ्यावी. जेणेकरून पिकामध्ये हवा खेळती राहिलं आणि ऊसाची वाढ़ चांगल्यापद्धतीने होईल.
आता पाचवा मुद्दाय कीड व्यवस्थापनाचा.
तर बघा ऊस म्हणलं कि खोड कीड, कांडी कीड, हुमणी, मावा ह्या काही महत्वाच्या किडी पीकावं येण्याची शक्यता असते. त्यामुळं त्यातनं वाचायचं असंल तर आळवणीतुन आणि फवारणीमधून क्लोरोपायरीफोस, थायोमिथाक्साम यांसारख्या कीटकनाशकांचा वापर करावा. बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बुरशीनाशकांचा देखील वापर फवारणी आणि आळवणीद्वारे करावा..
ह्यानंतर सहावा मुद्दा येतो पाणी व्यवस्थापनचा.
मंडळी उसाला जास्तीत जास्त ठिबक सिंचननंच पाणी द्यायचा प्रयत्न करावा. कृषिरत्न डॉ. संजीवन माने यांच्या मते उसाच्या पाणी व्यवस्थापनाचं एक सूत्र आहे आणि ते म्हणजे उसाला थोडं थोडं आणि सारखं सारखं पाणी द्यावं. उसाला अगदी जास्तही पाणी खपत नाही ज्यामुळे मुळंकूज होते आणि त्याचबरोबर उसाला खूप कमीही पाणी चालत नाहीं ज्यामुळे पीकात स्ट्रेस निर्माण होतो पर्यायाने ऊसाची वाढ़ संकुचित होते. त्यामुळे ठिबक हे पाणी देण्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय आहे. तर मंडळी हे काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याद्वारे जर तुम्ही उसाचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्हाला 100 टन उत्पादन घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाहीं..हा आता याउपर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आम्ही नक्कीच आमच्या एक्सपर्ट टीमच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हा तेव्हा आता लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अजून असेच शेतीसबंधित लेख वाचण्यासाठी रोजच्या रोज आपल्या वेबपोर्टलला भेट द्या.
Please follow us on Facebook – Our Page Link : 👇👇
https://www.facebook.com/aplavishaychbhari
Leave a Reply